जिल्ह्यात दारूबंदीनंतर अवैध दारूविक्री करणारे ‘माफिया’ जन्माला आले. त्यात  ‘वैरागड’वासी ‘गोलू’ याचे नाव सर्वात अग्रणी घेतल्या जाते. आता हाच ‘गोलू’ सूरजागड लोह प्रकल्पामध्ये मध्यस्थी करून खाण ‘माफिया’ बनल्याने प्रशासकीय यंत्रणेमध्ये त्याचा हस्तक्षेप वाढला आहे. अनेक अधिकाऱ्यांना तो खटकतोसुद्धा. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्याच्यावर मेहरनजर असल्याने कनिष्ठ अधिकारी खंत व्यक्त करण्यापलीकडे काहीही करू शकत नसल्याचे चित्र आहे. उत्खनन करणाऱ्या कंपनीतीत देखील हीच परिस्थिती असून या ‘माफिया’ने यातून अल्पावधीत कोट्यवधींची माया जमवली, अशी चर्चा नेहमीच असते.

हेही वाचा >>> नागपूर : देशातील रस्ते आता विमा, भविष्य निर्वाह निधीच्या पैशातून; नितीन गडकरी यांची माहिती

सूरजागड लोहप्रकल्प विविध कारणांनी कायम चर्चेत असतो. अवजड वाहनांमुळे होणारे अपघात असो की खराब झालेले रस्ते. सर्वसामान्य यामुळे त्रस्त आहे. २०१४-१५ साली जेव्हा खाणीत उत्खननाचे काम सुरू करण्यात आले तेव्हा या कंपनीने स्थानिकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत मध्यस्थीसाठी काही लोकांना अनधिकृतरित्या नमेले. त्यात हा ‘गोलू’ सर्वांचा म्होरक्या होता. अवैध धंद्यांचा अनुभव पाठीशी असल्याने कुठे कशी तोडजोड करायची यात तो तरबेज असल्याने कंपनीने त्याला जवळ घेतले. त्याच्यासोबत आणखी एक दारू माफिया देखील यात सामील झाला. अवैध दारूविक्री करताना सुरुवातीला यांचे अस्तित्व केवळ एका तालुक्यापुरते होते. मात्र, हळूहळू त्यांनी जिल्ह्यात जम बसविला. यात त्यांचे पोलीस विभागातील काही अधिकाऱ्यांशी सुत जुळले. मग नेत्यांशी देखील त्यांनी सलगी वाढविली. या ओळखीतून जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि पुरवठा जोमात सुरू झाला. तो आजही कायम आहे. त्याच्यावर विविध गुन्हे देखील दाखल आहेत. याच कुप्रसिध्दीचा फायदा त्याला झाला. सूरजागड लोहप्रकल्पात कंपनीने त्याला थेट वाटाघाटी करण्यासाठी नेमले. यातूनच कंपनी, प्रशासन आणि त्या परिसरात त्याचे प्रस्थ वाढले आणि तो दारूमाफियावरून खाण’माफिया’ झाला. आज त्याला प्रशासनात थेट प्रवेश आहे.

हेही वाचा >>> राजकारणातील ताण घालवण्यासाठी केजरीवाल करणार विपश्यना; दहा दिवसांसाठी नागपुरात दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एटापल्ली पोलीस विभागासह महसूल विभागात या माफियांचा कायम वावर असतो. अनधिकृत कामे नियमात बसवून करवून घेणे आणि त्याबदल्यात अधिकारी व नेत्यांना रसद पुराविने हे त्याचे नित्यक्रम. यापलीकडे उत्खनन किंवा वाहतूक संबंधी अडचण निर्माण झाल्यास ती सोडविण्यासाठी त्याने काही लोक नेमले आहेत. एवढेच नव्हे तर खाणीच्या प्रस्तावित विस्तारासाठी नुकतीच झालेल्या जनसुनावणीत देखील याने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. जनसुनावणी विनाअडथळा पार पाडावी यासाठी त्याने अथक परिश्रम घेतले. लोकांना कंपनीला पाहिजे ते बोलण्यास भाग पाडणे, त्यासाठी साम,दाम,दंड, भेद असे सारेच पर्याय वापरले. सुनावणीवेळी लोकांना आणि माध्यमांना आत जाण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र, हा महाशय प्रवेश द्वाराजवळ कुणाला प्रवेश द्यावे आणि कुणाला रोखावे हे बघत होता. आता त्याला हे अधिकार कुणी दिले हा संशोधनाचा विषय असला तरी जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेवरील या माफिया ‘गोलु’ची ‘दादागिरी’ प्रशासन किती काळ खपवून घेणार, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.