नागपूर : महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पात कृत्रिम बुद्धीमत्ता प्रणालीवर आधारित वन्यजीव निरीक्षण प्रणाली ‘आभासी भिंत’ कार्यान्वित करण्यात आली आहे. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने आणि बफर क्षेत्रातील लोकांची वन्यजीवांपासून सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ही प्रणाली तयार करण्यात आली.

आभासी भिंत म्हणजे काय?

आभासी भिंत ही आंतरजालयुक्त क्षमतांसह कृत्रिम बुद्धीमतेच्या कॅमेऱ्याची एक साखळी आहे. ती जंगल आणि गावाच्या सीमेवर एकमेकांशी जोडलेली आहे. गावाच्या सभोवताल असलेल्या आभासी भिंतीच्या आत जंगली जनावर शिरताच एकीकडे वनविभागाला त्याची माहिती मिळते तर दुसरीकडे हूटर म्हणजे सायरन वाजल्यामुळे गावकरी, शेतकरी आणि गुराखी ताततीने सुरक्षित जागेचा आश्रय घेतात. जंगलालगतच्या गावासभोवताली असलेल्या आभासी भिंतीच्या आत वन्यप्राणी शिरताच एकीकडे वनखात्याला त्याची माहिती मिळते, तर दुसरीकडे संवेदकाच्या मदतीने भोंगा (सायरन) वाजल्यामुळे गावकरीसुद्धा सजग होतात. त्यामुळे होणारा संघर्ष टाळणे सहज शक्य होते.

हेही वाचा >>>राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…

आभासी भिंतीमुळे काय होणार?

यात शेतकरी, गावकरी यांचा जीव वाचतो. तसेच गावातील पाळीव जनावरांनादेखील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातून वाचवता येते. शेतपिकांचे नुकसान टाळले जाते. जंगलाबाहेर उभारलेल्या आभासी कुंपणातील थर्मल लहरींच्या आधारे वाघ, बिबट्यांच्या आगमनाचा इशारा मिळेल. जंगलातून एखादा वाघ गाव-शहराकडे निघाला तर थर्मल लहरींद्वारे इशारा मिळेल. तसेच या प्रणालीमुळे व्याघ्रप्रकल्पातील मानवी हस्तक्षेप, अवैध बेकायदेशीर घुसखोरी किंवा शिकारीच्या उद्देशाने जंगलात होणारी घुसखोरी याला देखील आळा घालता येणार आहे. 

पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या आभासी भिंतीमध्ये नवीन काय आहे?

पेंच व्याघ्र प्रकल्पाने हे कॅमेरे विशेष पद्धतीने बनवून घेतले आहेत, जेणेकरुन ते फक्त एकाच जागी स्थिर राहणार नाहीत तर हलवता (पोर्टेबल असतील) येतील आणि ज्या भागात मानव-प्राणी संघर्षाच्या घटना अधिक आहेत तेथे त्यांचा वापर करता येईल. त्यामुळे कॅमेऱ्यांची साखळी कायमस्वरूपी ठेवण्याची गरज भासणार नसल्याने खर्च कमी होईल.

उपसंचालक काय म्हणतात?

आभासी भिंतीचा उद्देश वास्तविक-वेळ निरीक्षण प्रणाली तयार करून मानव-वाघ संघर्ष कमी करणे आहे. यामुळे वाघ आणि इतर हिंस्र प्राण्याच्या  हालचाली शोधता येतात. तसेच वनअधिकाऱ्यांना लवकर सूचना मिळू शकते. यामुळे मानव आणि पाळीव प्राणी यांच्यावरील हल्ल्याचा धोका कमी होतो, असे पेंच व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल म्हणाले.

हेही वाचा >>>राज्यात पावसाचा जोर वाढणार, हवामान खाते…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ताडोबात या प्रयोगाचे परिणाम काय?

आभासी भिंतीचे आश्वासक परिणाम दिसू लागले आहेत. संवेदक (सेन्सर) बसवल्यापासून वनरक्षकांनी मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना नोंदवण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे. हा प्रकल्प अभयारण्याच्या अधिक क्षेत्रांना व्यापण्यासाठी वाढवला जाण्याची अपेक्षा आहे. जगभरातील इतर वन्यजीव अभयारण्यांसाठी ते एक प्रतिरूप (मॉडेल) म्हणून काम करू शकेल.