अकोला: मोसमी पूर्व पावसाने अकोला शहरासह जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस झाला. मंगळवारी सायंकाळी तीन तासांत तब्बल ९५.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. विविध भागात रात्रभर सुरू असलेला पाऊस बुधवारी ९ वाजतानंतर थांबला. रात्रभर झालेल्या पावसामुळे अनेक भागातील मोठ-मोठी वृक्ष उन्मळून पडली. वीज पुरवठा खंडित होऊन इंटरनेट सुविधा देखील प्रभावित झाल्याचे चित्र आहे.

अकोला जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोसमी पूर्व पावसाने मुक्काम ठाेकला आहे. शहरात २७ मे रोजी सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी वारा सुरू झाला. त्यानंतर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले. जिल्हा स्त्री रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृहात देखील पाणी शिरले होते.

रस्ते पाण्याने भरले होते. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर वृक्ष पडले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. रस्त्याच्या बाजुला करून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. शहरातील मोठे नाले हे मर्यादा ओलांडून वाहत असल्यामुळे काही सखल भागांमध्ये पाणी शिरले. जेसीबी व सफाई कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने नाल्यांचे पाणी वाहते करण्यात येत आहे. शहरात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास मनपाचे झोन कार्यालये आणि नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, मोटर वाहन विभाग हे २४ तास सुरू ठेवण्यात आले.

शहरातील मोठं-मोठी वृक्ष वीज वाहिन्यांवर कोसळल्याने शहराच्या अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला. वृक्ष बाजूला करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्धस्तरावर कार्य केले जात आहे. काही भागातील वीज पुरवठा १२ तासांहून अधिक काळापासून खंडित असल्याने नागरिक त्रस्त झाले. या मुसळधार पावसामुळे प्रशासनाच्या मोसमी पूर्व तयारीच्या मर्यादा उघड झाल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१०७ गावातील ११३२ हेक्टरवर नुकसान

अकोला जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे १०७ गावातील ११३२ हेक्टर शेतीचे नुकसान झाले. या पावसामुळे उन्हाळी कांदा, भुईमूंग, ज्वारी, लिंबू, केळी, मका, तीळ, मुंग आदी पिकांना मोसमी पूर्व पावसाचा मोठा फटका बसला आहे. अकोला तालुक्यातील ३४ गावातील २८६ हेक्टर, बार्शिटाकळी नऊ गावातील ३५ हेक्टर, बाळापूर ३७ गावातील २५० हेक्टर व पातुर तालुक्यातील २७ गावांमध्ये ५६१ शेतीचे नुकसान झाले आहे.