अकोला : जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील विवरा परिसरात १० जूनला एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला. मात्र, उत्तरीय तपासणी अहवालात ती हत्या असल्याचे स्पष्ट झाले. यावरून पोलिसांनी तपासाचे सूत्र वेगाने फिरवत दोन पैकी एका आरोपीला अटक केली आहे. मद्य देण्यास नकार दिल्याने संतापाच्या भरात दोघांनी एकाची निर्घृण हत्या केली. रमेश सूपाजी निंबोकार (वय ४९, रा.विवरा) असे मृतकाचे नाव आहे.

पातूर तालुक्यातील विवरा परिसरात एका व्यक्तीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह १० जून रोजी आढळून आला होता. या प्रकरणात चान्नी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, उत्तरीय तपासणी अहवालात ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. १० जून रोजी दुपारी ३.४५ वाजताचे सुमारास सोपीनाथ नगरा जवळील लिंबाच्या झाडाखाली रमेश निंबोकार बसलेले असताना संतोष ढोले व वैभव सहदेव पजई (दोघेही रा. विवरा) हे तेथे आले. त्यांनी मद्य देण्याची मागणी केली. त्याचा त्यांनी नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या दोघांनी रागाच्या भरात रमेश निंबोकार यांना लाथाबुक्क्यांनी व लाठीकाठीने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या प्रकरणी मृतकाचे भाऊ सुरेश सुपाजी निंबोकार यांच्या तक्रारीवरून चान्नी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी संतोष ढोले याला अटक करून पातूर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मृतकाच्या उत्तरीय तपासणी अहवालानंतर हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा झाला. उत्तरीय तपासणी अहवालानुसार छातीत गंभीर जखमा व रक्त गोठल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार हत्येचा गुन्हा दाखल करून एकास अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यात हत्येचे सत्र

अकोला जिल्ह्यात हत्येचे सत्र सुरूच आहे. अकोला शहरात मद्याच्या वादामधून काकानेच पुतण्याला मारून टाकले होते. दगडाने ठेचून ३१ मे रोजी ही हत्या करण्यात आली होती. त्यानंतर २ जून रोजी सेवानिवृत्त अभियंता संजय कौसल यांची गुंड प्रवृत्तीच्या महेंद्र पवार याने निर्घृण हत्या केली. अकोट तालुक्यात २२ वर्षीय तरुणाची हत्या झाली. आता पातूर तालुक्यात हत्या झाली आहे.