अकोला : पश्चिम वऱ्हाडामध्ये ट्रकमधून अवजड क्षमतेतून अधिक धोकादायक वाहतूक होत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता वाढली आहे. या विरोधात प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने विशेष मोहीम राबवून कारवाई सुरू केली आहे. अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यात ६५ अवजड वाहनांवर कारवाई करून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ट्रकमधून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक केली जाते. अनेक वेळा क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक होत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता असते. त्यामुळे क्षमतेहून अधिक माल वाहून नेणाऱ्या मालमोटारी व जड वाहनांविरूद्ध प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कारवाईची मोहीम सुरू केली. मोहिमेच्या पहिल्या दिवशी सुमारे ५०० वाहनांची तपासणी पथकाकडून करण्यात आली. अकोला जिल्ह्यात ४५ वाहने ठरवून दिलेल्या क्षमतेहून अधिक माल वाहून नेत असल्याचे आढळून आले. या प्रकरणात अवजड माल वाहून नेणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या वाहनांवर केलेल्या कारवाईतून २३ लाख रुपयांचा दंड शासन जमा करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यात १०, तर वाशीम जिल्ह्यामध्ये ११ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या मार्गदर्शनात सर्व मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, वाहनचालक यांनी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाचे मनोज शेळके यांनी दिली.

चार कोटींचे लक्ष्य, ६० टक्के वसूल

अवजड वाहतूक क्षमतेपेक्षा अधिक केल्या जात असल्याने विशेष मोहीम राबवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मोहिमेसाठी चार कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यापैकी फेब्रुवारीपर्यंत ६० टक्के वसुलीचे लक्ष्य पूर्ण झाले आहे. सर्व वाहनधारकांनी आपली सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेऊन वाहने चालविताना मोटार वाहन कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. वाहनात क्षमतेपेक्षा जास्त वजनाचा माल भरल्यास अपघाताचा धोका होऊ शकतो. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करू नये, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गैरफायदा घेणाऱ्यांच्या विरोधात करा तक्रार

वाहन तपासणीदरम्यान विभागाच्या नावावर वाहनधारकांनी वेठीस धरून गैरफायदा घेणाऱ्यांच्या विरोधात कार्यालयात तत्काळ तक्रार दाखल करावी. वाहनचालक, मालक यांनी असामाजिक घटकांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. वाहन तपासणी मोहिम पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यांत राबविण्यात येत आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी सांगितले.