भंडारा : काल दुपारी वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान एक विद्युत तार वादळी वाऱ्यामुळे तुटून गायीच्या गोठ्यावर पडली. यात गोठ्यातील वासराचा दुर्दैवी अंत झाला. या वासराला काय झाले हे पाहण्यासाठी जवळच उभी असलेली एक महिला तेथे गेली. नकळत या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने तिचाही जागीच मृत्यू झाला. आईला काय झाले म्हणून जवळच उभा असलेला लेक धावला मात्र त्याचाही स्पर्श विद्युत तारेला झाला आणि करूण अंत झाला. मायलेकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

साकोली तालुक्यातील मालूटोला येथील महानंदा प्रभुदास इलमकर व सुशील प्रभुदास ईलमकर हे दोघे मायलेकांचा शेतामध्ये विद्युत तारांच्या स्पर्शाने तीव्र धक्क्याने या दोघांचा रविवार दिनांक ५ सप्टेंबरला दुपारी २ वाजता दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मालूटोला येथील येथे दुपारच्या वेळात वादळ वारा आल्याने लाकडाच्या बल्लीवर लावलेली विद्युत तार तुटली. या जिवंत तारेवर गाईचे वासरू गेल्याने विजेच्या धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाल. वासराला काय झाले पाहण्यासाठी महानंदा ईलमकर (५०) गेल्या असता त्यांनाही विजेचा धक्का लागून त्यांचाही मृत्यू झाला. आईला पाहण्यासाठी दिलेले सुशील ईलमकर वय ३० याला देखील जिवंत तारांचा स्पर्श होऊन विद्युत धक्क्याने त्याचाही मृत्यू झाला.

दुपारी दोन वाजता शेतात गेलेले मायलेक घरी परत न आल्यामुळे पती प्रभुदास ईलमकर हे सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान शेतात गेले असता त्यांना पत्नी आणि मुलगा तसेच जवळच एक वासरू मेलेल्या अवस्थेत दिसले मन हे लावून टाकणारे हे दृश्य बघून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी लगेच गावात येऊन ही घटना सांगितली गावकऱ्यांनी शेतात पाहिले असता मायलेकाचा व वासराचा मृत्यू झाल्याची घटना गावकऱ्यांच्या लक्षात आली. तेव्हा पोलीस पाटील टेंभरे यांनी साकोली पोलिसांना या घटनेची माहिती रात्री आठ वाजता दिली आहे.