भंडारा : सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा भंडारा शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष दिलीप बावनकर (५९, रा. विदर्भ हाऊसिंग कॉलनी भंडारा) यांनी वैनगंगा नदीत उडी घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांनी कोणत्या कारणातून टोकाचे पाऊल उचलले याचे कारण कळू शकले नाही.
दिलीप बावनकर हे तीन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. नदीत बुधवारी (दि.५) उडी घेतली होती, दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला. दिलीप बावनकर हे कोथुर्णा येथील जि.प. शाळेतून उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदावरून ३१ जुलै २०२५ रोजी सेवानिवृत्त झाले होते. ते एका खासगी पतसंस्थेचे अध्यक्ष होते, अशी माहिती आहे.
५ नोव्हेंबरला ते आपल्या मित्राची मोटारसायकल घेऊन वैनगंगेच्या कारधा लहान पुलावर गेले. तिथे त्यांनी मोटारसायकल ठेवली. त्यानंतर त्यांनी वैनगंगेत उडी घेतली. भंडारा पोलिसांना पुलावर मोटारसायकल, चप्पल, मोबाईल, चष्मा आढळून आल्याने संशयाची सूई अधिकच बळावली. गुरूवारी (दि.६) पोलिसांनी स्थानिक गोताखोरांच्या मदतीने बोटीद्वारे वैनगंगा नदीपात्र पिंजून काढला. मात्र, सायंकाळपर्यंत मृतदेह हाती लागला नाही. रात्री उशिरा त्यांचा मृतदेह सापडला.
शुक्रवारी (दि.७) दुपारच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे कुटुंबासह शहरातही हा व्यक्त केली जात आहे.
