बुलढाणा : राज्याचे जलसंपदा मंत्री (कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मराठा आरक्षणवरून टीका केली.

बुलढाणा अर्बन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा स्थानिक सहकार विद्या मंदिरमध्ये आज, गुरुवारी पार पडला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मराठा व ओबीसींमधील आजच्या वादाचे, संघर्षाचे खापर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर फोडले.

नागपूरमध्ये उद्या ओबीसींचा मोर्चा असून अध्यादेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत विखे पाटील म्हणाले, ओबीसी नेत्यांच्या गैरसमजातून हे घडत आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता ‘हैदराबाद गॅझेट’ची प्रक्रिया सुरू आहे. ओबीसींच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये, अशी माझी विनंती आहे. ओबीसींना आरक्षण देताना मराठा समाजाने कधी विरोध केला नाही. हे पाप शरद पवार यांनी १९९४ मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना केले आहे. त्यावेळी मराठा समाज ओबीसीमध्ये समाविष्ट केला असता तर हा विषयच राहिला नसता. यामुळे या पापाचे धनी शरद पवार असल्याचे विखे पाटील यांनी ठासून सांगितले. यामुळे मोर्चेकऱ्यांनी आधी शरद पवारांना याचा जाब विचारावा, असे ते म्हणाले.

संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम

नेत्यांच्या जाहिरातीसाठी पैसे आहेत, मात्र शेतकऱ्यांसाठी नाही, या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपावर बोलताना विखे पाटील म्हणाले, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ३५ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. तरीही ते असे बोलताहेत. राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. जसा कोंबडा सकाळी बांग देतो तसेच काहीसे काम ठाकरेसेनेने राऊत यांना दिले आहे.

‘आनंदाचा शिधा’ कायमस्वरूपी योजना नव्हती

आनंदाचा शिधा ही कायमस्वरुपी योजना नव्हती, ती केवळ सणासुदीसाठी होती. लाडक्या बहिणींसाठी एकाद्या विभागाचा, योजनेचा निधी वळवण्याची ओरड करणे म्हणजे राज्यातील लाडक्या बहिणींचा अवमान आहे, असा युक्तिवादही त्यांनी केला. या योजनेद्वारे महिलांना मूळ प्रवाहात आणण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, यात विरोधक आडकाठी आणण्याचे काम करीत असल्याचे विखे पाटील यावेळी म्हणाले.