चंद्रपूर : माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार नाल्यावरील संरक्षण भिंतीच्या बांधकाम प्रकरणावरून पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकले आहेत.
आमदार किशोर जोरगेवार यांनी सराफा व मद्य वितरण कंपनीच्या संचालक मित्राच्या ‘हवेली गार्डन’ मार्गावरील प्रशस्त निवासस्थानालगतच्या नाल्यावर बांधलेल्या संरक्षण भिंतीसाठी शासकीय निधीचा वापर केला. या भिंत बांधकामात शासकीय निधीचा गैरवापर झाल्याची तक्रार खरी आहे का?, पूरग्रस्त भागात संरक्षण भिंत का नाही? या प्रकरणाची चौकशी झाली का? कारवाई काय? कारवाई न झाल्यास विलंबाची कारणे काय, असे तारांकित प्रश्न आमदार मुनगंटीवार यांनी आगामी विधिमंडळ अधिवेशन कामकाजात उपस्थित केले आहे. त्यावर आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाने माहिती मागवली असून, प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. यामुळे मुनगंटीवार व जोरगेवार या भाजपच्या दोन आमदारांमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जोरगेवार यांनी शासकीय निधीचा वापर करून मित्राचे निवासस्थान तसेच भूखंडाच्या संरक्षणासाठी ही भिंत बांधल्याचा आरोप करीत आम आदमी पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.