चंद्रपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समविचारी पक्षांसोबत आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाणार आहे. मनसे कडून आघाडीचा प्रस्ताव आलेला नाही. मनसे कडून प्रस्ताव आला तरी पक्षाचे वरिष्ठ नेते यासंदर्भात निर्णय घेतील. तसेच काही पालिकेत बहुजन समाज पक्षासोबत आघाडी होणार आहे. नगराध्यक्ष पदाच्या मुलाखती सुरू असल्या तरी मुंबईत १२ व १३ नोव्हेंबर रोजी काँग्रेस निवड मंडळाची बैठक होणार आहे. त्यानंतरच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित केले जातील अशी माहिती काँग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली
चंद्रपूर जिल्ह्यातील दहा नगर पालिका व एक नगर पंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी ५५ इच्छुक उमेदवारांनी शुक्रवार ७ नोव्हेंबर रोजी येथे मुलाखती दिलेल्या आहेत. तर ६०० इच्छुक उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी कॉंग्रेस पक्षाकडे अर्ज केले आहेत. नगराध्यक्ष पदासाठीची स्पर्धा व उमेदवारांचा प्रतिसाद बघता पालिका निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला अतिशय पोषक वातावरण आहे. त्यामुळे आम्ही पालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकवू. महाविकास आघाडी म्हणूनच निवडणूकीला सामोर जाणार आहे. काही नविन मित्रही या आघाडीत सहभागी होत असल्याची माहिती कॉंग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
दाताळा येथील साईराम सभागृहात कॉंग्रेसच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. यानंतर कॉंग्रेस विधीमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा प्रभारी आमदार अभिजित वंजारी, जिल्हा निरीक्षक मुजीब पठाण, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, प्रविण पडवेकर यांनी पत्रपरिषदेत कॉंग्रेस पक्षाकडे उमेदवारांचा ओघ बघता अतिशय पोषक वातावरण असल्याचे सांगितले.
पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी राहणार की नाही हा प्रश्न होता. मात्र आघाडीचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे आम्ही स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे तसेच इतर मित्र पक्षांशी आघाडी केली आहे. मनसे समविचारी पक्ष नाही. तसेच मनसेकडून आघाडीचा प्रस्ताव आलेला नाही. त्यामुळे तुर्ततरी मनसे संदर्भातील निर्णय झालेला नाही असेही सांगितले. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढणार असलो तरी वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात सर्व बाबी स्पष्ट होतील अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येक पालिकेतून सात ते आठ इच्छुकांनी मुलाखती दिलेल्या आहेत. घुग्घुस, बल्लारपूर, ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक इच्छुक आहेत. आज येथे नगराध्यक्ष पदाच्या मुलाखती झाल्या असल्या तरी नगरसेवक पदासाठी नगर पालिका स्तरावर मुलाखतींना शनिवार पासून सुरूवात होत आहे. मुलाखतींचा सोपस्कार पार पडल्यानंतर १२ व १३ नोव्हेंबर रोजी कॉग्रेस निवड मंडळाची बैठक होईल. तिथे अंतिम निर्णय होईल अशीही माहिती वडेट्टीवार यांनी दिली. खासदार प्रतिभा धानोरकर यांनीही महाविकास आघाडीला सकारात्मक वातावरण असल्याची माहिती दिली. तर जिल्हा प्रभारी आमदार अभिजित वंजारी यांनी मुलाखतींचा कार्यक्रम अतिशय योग्य पध्दतीने पार पडल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी ५० ते ५५ इच्छुक उमेदवार असल्याने स्पर्धा वाढली असल्याची माहिती दिली. राजुरा पालिकेत नगराध्यक्ष पदासाठी केवळ दोन इच्छुक उमेदवार असल्याचेही त्यांनी सांगितले.
चंद्रपूर शहराला भ्रष्टाचाराची नविन किड लागलेली आहे. आज प्रत्येक कामात २० ते २५ टक्के कमिशन घेतले जात आहे. महापालिका निवडणुकीत चंद्रपूर पालिका आणि तेथील भ्रष्टाचार तसेच भ्रष्टाचाराची नविन किड याचा भांडाफोड करणार असल्याची माहिती विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
