नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यात ‘रमी क्लब’,‘सोशल क्लब’च्या नावाखाली चक्क आंतरराज्यीय जुगार अड्डे सुरू आहेत. आंध्रप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातील मोठमोठ्या व्यावसायिकांनी जिल्ह्यात आपापले अड्डे थाटले आहेत. सोनुर्ली गावात जवळपास शंभरपेक्षा जास्त वाहनांनी जुगार खेळणारे येत असून याकडे जिल्हा पोलिसांचे ‘दुर्लक्ष होत आहे.

चंद्रपुरातील सीमावर्ती भागात राजुरा, सोनुर्ली, कोरपना आणि जिवती या ठिकाणी ‘सोशल क्लब’,‘रमी क्लब’च्या नावावर जुगार अड्डे सुरू आहेत. ‘रमी क्लब’मध्ये ‘कॉईन’च्या माध्यमातून जुगार अड्ड्यांवर लाखोंची उलाढाल होते. तेलंगणा, छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशातून एकाच दिवसात जवळपास १०० मोटारी चंद्रपुरातील सोनुर्लीसारख्या छोट्याशा गावात पोहचतात. या मोटारीत तेलंगणातील दारूचा मोठा साठा असतो. पाचशेवर लोक ‘रमी क्लब’च्या नावावर जुगार खेळण्यासाठी येथे येतात.

हे ही वाचा…भाजप आमदार व कुटुंबीयांविरुध्दच्या, तक्रारीचा तपास का थंडावला?

जिल्हाधिकाऱ्यांकडून या ‘रमी क्लब’ला केवळ १० टेबलची परवानगी आहे. मात्र, क्लबचा संचालक २० टेबल लावून तेथे मनोरंजनात्मक खेळाऐवजी जुगार अड्डा भरवतो.
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वातावरण आहे. आचारसंहिता लागलेली आहे. या काळात एका ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून प्रशासन सतर्क असते. मात्र, सोनुर्लीसारख्या गावात एका जुगार अड्ड्यावर पाचशेपेक्षा अधिक लोक जमा होतात. जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक ‘रमी क्लब’ला परवानगी दिल्यामुळेच हा संपूर्ण प्रकार सर्रास घडत असल्याची चर्चा आहे.

हवाल्यातील पैसा जुगारात

आंध्रप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातील मोठमोठे व्यापारी हवाला व्यवसायात गुंतलेले आहेत. अवैध मार्गाने कमावलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी जुगार अड्ड्यांचा वापर केला जात आहे. महाराष्ट्राच्या चंद्रपुरातील ‘रमी क्लब’चे सदस्यत्व आंध्रप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यातील नागरिकांकडे नाही. तरीही या राज्यांतील व्यापारी ‘रमी क्लब’चे सदस्यत्व असल्याचे दाखवून येथे येतात. सोनुर्लीसारख्या नक्षल प्रभावित छोट्याशा गावात ५०० वर लोग जुगार खेळण्यासाठी येत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा…विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘एबीव्हीपी’मध्ये अचानक मोठा बदल… लोकसभेत फटका बसल्याचा परिणाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलीच कशी?

‘रमी क्लब’च्या नावावर जुगार अड्डा भरवण्याचा पहिला प्रयत्न राजुरा येथील एका लॉनमध्ये करण्यात आला होता. मात्र, तेथे पोलिसांनी छापे घालून तो क्लब बंद पाडला. आता पोलीस अधीक्षक कार्यालयातून ‘रमी क्लब’, ‘सोशल क्लब’ला परवानगी दिली जात नाही. त्यामुळे जुगार अड्डे संचालक थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे हजेरी लावत आहेत. जिल्हाधिकारीसुद्धा ‘रमी क्लब’ची कोणतीही शहानिशा न करता परवानगी देत आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात ‘रमी क्लब’च्या नावावर जुगार अड्डे भरविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.