गोंदिया: भाज्यांचे भाव वाढले की सर्वसामान्य नागरिकां पासून ते विविध माध्यमांतून सगळेच ओरड करू लागतात. “गृहिणींचे बजेट बिघडले” पासून तर “सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर” असे मथळे करून ओरड केली जाते. मात्र सध्या घडीला भाजीपाला उत्पादक अत्यंत वाईट काळातून जात आहेत. गोंदिया भाजी बाजारात कोणत्याही भाजीचा भाव ५० ते ६० रुपये किलोच्या वर नाही. आणि यात ही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था तर फारच बिकट आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मुख्य भाजी बाजारात टोमॅटो दीड ते अडीच रुपये किलो दराने विक्री करण्याची नामुष्की ओढवली आहे. तर या दरात पण व्यापाऱ्यांना टोमॅटो खरेदी करून त्यावर नफा मिळवणे आणि खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. एकेकाळी याच गोंदियातील मुख्य भाजी बाजारात टोमॅटो २०० रुपये प्रति किलो पर्यंत विक्री झालेला आहे. त्या दिवशी गोंदिया भाजी बाजारातील एका व्यापाऱ्याचे दहा कॅरेट टोमॅटो चोरी झाल्याचे प्रकरण पण गोंदिया शहर पोलीस ठाण्यात दाखल आहे. तीन ते चार महिन्यापूर्वी ८० ते ते १०० रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो सध्या ५ रुपये किलो दराने विकला जात आहे. काही ठिकाणी तर दीड किलोपर्यंत टोमॅटो १० रुपयांना विकला जात आहे. घाऊक बाजारात दीड ते अडीच रुपये तर चिल्लरमध्ये आठ ते दहा रुपये दराने विक्री केली जात होती. या मुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च भागवणे कठीण झाले होते. धान पाठोपाठ गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आता पालेभाज्यांची ही सर्वाधिक उत्पादन करतात. त्यामुळे त्यांना दैनंदिन खर्चासाठी रोख रक्कम उपलब्ध होते. बहुतांश ठिकाणी सिंचनाच्या सुविधा उपलब्ध असल्याने जिल्ह्यात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. जिल्ह्यातील भाजीपाला जवळच्या बाजारपेठेत वापरला जातो आणि इतर शहरांमध्ये ही पाठविला जातो.
टोमॅटो हे एक असे उत्पादन आहे जे प्रत्येक घराच्या स्वयंपाक घरात दररोज वापरले जाते. गेल्या वर्षी टोमॅटोचा भाव १०० ते १५० रुपये किलोपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे त्यावेळी शेतकऱ्यांना चांगलाच फायदा झाला होता. त्यामुळे बहुतांश शेतकरी टोमॅटो उत्पादन कडे वळले. यामुळे यावर्षी टोमॅटोचे भरपूर उत्पादन झालेले आहे. बाजारातील नियमानुसार पुरवठा अधिक आणि मागणी कमी असे सूत्र यावर्षी तयार झाले असल्यामुळे यंदा टोमॅटोचे उत्पादन घेणारे शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन आठवड्या पासून दररोज बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक होत आहे. या अधिकच्या पुरवठ्यामुळे टोमॅटो सह इतरही भाज्यांचे भाव पडले. तीन-चार महिन्यांपूर्वी ६० ते ८० रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आता १० रुपये किलोने दीड किलोने विकला जात आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी आणि दुकानदारही आपला माल बाजारातून घरी नेण्याऐवजी मिळेल त्या भावाने बाजारात विकत आहेत. टोमॅटो हा लवकर खराब होत असल्यामुळे विक्रेतेही ते लवकरात लवकर विकून मिळेल ती रक्कम मिळवून ते फायदेशीर मानत आहेत. भाजी बाजाराच्या आजू बाजूला फेकण्यात आलेल्या खराब टोमॅटोमुळे भटकंती करणारे गुरे आणि इतर जनावरांना चारा उपलब्ध होत आहे. पण टोमॅटोचे उत्पादक शेतकरी दर वाढण्याची वाट पाहत आहेत.
उत्पादन खर्च काढणे कठीण..शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी..
टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या अत्यंत वाईट काळातून जात आहेत. गोंदिया शहरातील बाजारपेठेत येणारे टोमॅटो जवळच्या ग्रामीण भागातूनच येतात. सध्या घाऊक बाजारात २४ किलो वजनाची कॅरेट ३० ते ४५ रुपये दराने विक्री केली जात आहे. चिल्लर बाजारात टोमॅटोही ५ रुपये किलो ने मिळत आहे. अशा परिस्थितीत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यांचा उत्पादन खर्च काढणेही कठीण होत आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.मनोज डोहरे, सचिव भाजी विक्रेते संघटना, गोंदिया