नागपूर : रस्त्यावरील मोकाट श्वान ही समस्या दिवसेंदिवस गंभीर रुप घेत आहे. मोकाट फिरणाऱ्या श्वानांसाठी महापालिकेकडे कुठलीही पर्यायी व्यवस्था नाही. की त्यांचा बंदोबस्त करावा, असे धोरणही नाही. त्यामुळे गल्लोगल्ली मोकाट श्वानांच्या टोळ्या दिसतात. हे श्वान रात्रीच्या वेळी रस्तांवरून येणाऱ्या – जाणाऱ्या वाहनांच्या मागे धावतात. यातून घडणारे अपघातही आता नवे नाहीत. अशीच एक दुर्दैवी घटना शाळकरी मुलासोबत घडली.

रविवारी सुटीच्या दिवस असल्याने पावनगाव येथील १० माळ्यांच्या देव हाईट्स इमारती खाली प्रांगणात काही शाळकरी मुले खेळत होती. खेळून झाल्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास त्यातील काही मुले घरी गेली. त्याच इमारतीत पाचव्या माळ्यावरील घराकडे जयेश बोकडे (वय १२) हा परत जात होता. जयेशचे घर याच इमारतील पाचव्या माळ्यावर आहे. त्याच वेळी प्रांगणात एक मोकाट श्वान त्याच्यावर भूंकू लागला. श्वान पिच्छा सोडत नसल्याने जयेश घाबरला. कावरा बावरा झाला. श्वान मागे धावत असल्याने त्याच्यापासून वाचण्यासाठी जयेश जीवाच्या आकांताने सैरावैरा धावत सुटला. श्वान चावेल ही भीती त्याच्या मनात होती. पायऱ्यावरून धावत धावत तो इमारतीवर चढला. धावण्याच्या नादात त्याला कशाचेही भान राहिले नाही. धावता धावता अचानक तोल गेल्याने तो इमारतीच्या सहाव्या माळ्यावरील कॉमन खिडकीतून खाली कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जयेशला तातडीने भवानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोवर काळाने डाव साधला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सँडविच पार्टी ठरली अखेरची…

इमारतीत राहणाऱ्या कुटुंबातील ही शाळकरी मुले खाली प्रांगणात खेळत होती. खेळण्यापूर्वी या मुलांनी दुपारी सँडविच पार्टीही केली होती. जयेश बोकडेसाठी ही पार्टी अखेरची ठरली. जयेशचा असा अपघाती मृत्यू झाल्याने ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असलेल्या त्याच्या वडीलांना धक्का बसला आहे.