नागपूर : शहरात रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सर्वाधिक अपघात मध्यरात्र ते पहाटेच्या सुमारास होत असून शहरात पुन्हा एकदा ‘हिट अँड रन’ची घटना उघडकीस आली आहे. भरधाव स्कॉर्पियो कारने एका दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी पहाटे चार वाजता जरीपटका पोलीस ठाण्यासमोरील खोब्रागडे चौकात झाला. अमन नियाजुद्दीन शेख (२२) असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. अरमान कुरेशी, आतिफ पठाण आणि इनायत पठाण अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरु आहे.

जरीपटका कॉम्प्लेक्समधील नुरी मशिदीजवळ राहणारे नातेवाईक इम्रान कुरेशी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमन शेख हा मित्र अरमान कुरेशी, आतिफ पठाण आणि इनायत पठाण यांच्यासह गेला होता. रात्रीच्या तीन वाजेपर्यंत त्यांनी वाढदिवासाची पार्टी साजरी केली. त्यानंतर पहाटे चार वाजता अमनने एकाच दुचाकीवर तिनही मित्रांना बसवले आणि घराकडे निघाले. खोब्रागडे चौकातून जात असताना मागून भरधाव आलेल्या स्कॉर्पियोने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील चौघेही रस्त्यावर फेकल्या गेले. या अपघातात अमनच्या डोक्याला जबर मार लागला . त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन युवक गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर जवळपास अर्ध्यातासानंतर जरीपटका पोलीस घटनास्थळावर पोहचले. तोपर्यंत नागरिकांनी जखमींना मेयो रुग्णालयात नेले. जखमींवर उपचार सुरु असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपी स्कॉर्पियो कार चालक रामेंद्रसिंग दौलत परिहार (वाडी) याला अटक केली.

हेही वाचा : अचलपूरच्‍या भाजप उमेदवाराविरोधात पक्षाअंतर्गत सामूहिक बंड; ‘डमी’ उमेदवार दिल्‍याचा आरोप

अपघातात तरुणाचा मृत्यू

वाहन चालविताना संतूलन बिघडल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. सोनेगाव ठाण्यांतर्गत हा अपघात झाला. अर्जून नरेंद्र केडिया (२९, रा. साई कृपा अपार्टमेंट, मनीषनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी दुपारी ४.३० वाजता अर्जून केडिया हा दुचाकीने घरी जात होता. वर्धा रोड, सोमलवाडा चौकात त्याचे दुचाकीवरून संतुलन सुटले. तो त्याच्या मागून येणाऱ्या वाहनावर धडकला. त्याच्या डोक्याला मार लागला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले असता येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी भाऊ नकूल नरेंद्र केडिया याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला.

Story img Loader