नागपूर : वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो. आज वसुबारस सर्वत्र साजरा केला जात असताना शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूर महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. महापालिकेच्या निवडणुका न झाल्याने गेल्या पावणे दोन वर्षांपासून नागपूर महापालिकेत प्रशासक आहे. त्यापूर्वी येथे सलग तीनवेळा भाजपची सत्ता होती. आता नगरसेवक नसल्याने लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. याविरोधात काँग्रेसने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी महापालिकेवर धडक दिली.

हेही वाचा : अकोल्यात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला धक्का, माजी जिल्हाप्रमुखांसह पदाधिकारी शिंदे गटात

नागपूर शहरात प्रदूषण आहे. जिकडे-तिकडे अवैध होर्डिंग लागले आहेत. त्यामुळे शहर विद्रुप होत आहे. नागपुरात खासगी कंपनीकडे कचरा उचलण्याची आणि त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु नियमित कचरा उचलल्या जात नाही. अनेक वस्त्यांमध्ये कचरा दोन-तीन दिवस कचरा पडलेला असतो. त्यामुळे ए.जी. आणि बी.व्ही.जी. या कचरा संकलन करणाऱ्या कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने डांबरी रस्त्यांवर खड्डे झाले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.