नागपूर : कार्यालयातून घरी परतणाऱ्या अभियंता तरूणीचे प्रेमी युगुलाने पिस्तूलच्या धाकावर अपहरण केले. तिच्या मोबाईलवरून वडिलांना फोन करून ‘मुलगी जिवंत पाहिजे असल्यास तीस लाख रुपये तयार ठेवा,’ अशी धमकी देऊन खंडणी मागितली. अपहरण आणि धमकीमुळे तरूणीच्या वडिलांचा थरकाप उडाला. त्यांनी लगेच पोलिसांची मदत घेतली. प्रतापनगर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे लोकेशन मिळवून अपहृत तरूणीची सुटका केली. तसेच अपहरणकर्त्या प्रेमी युगुलांना अटक केली. मुलगी सुखरूप परतल्याने कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
उत्कृष्ठ कामगिरी बद्दल पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी पथकाचे कौतुक केले. स्वप्नील मरसकोल्हे (२५) आणि चेतना बुरडे (२३)दोन्ही रा. भंडारा, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोघांचेही बीएसस्सीपर्यंत शिक्षण झाले असून मागील दोन वर्षांपासून महाजनवाडी, एमआयडीसी येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहतात. स्वप्नील हा एमआयडीसी येथील एका कंपनीत काम करायचा. अलिकडेच त्याचे काम सुटले. तो दुसऱ्या कंपनीत कामाला लागला. मात्र, पगार कमी असल्याने त्यांना पैशाची चणचण भासत होती. त्यांनी क्राईम वेब सिरीज पाहून अपहरणाची योजना आखली. विरोध करण्याची क्षमता नसेल आणि सहज तिला पकडता येईल, अशा तरुणीचा महिनाभरापासून ते शोध घेत होते.
हेही वाचा…बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता, अमरावतीत मैत्रिपूर्ण लढत देण्याची घोषणा
पीडित तरुणी कम्प्युटर इंजिनिअर असून एमआयडीसी येथील एका कंपनीत काम करते. आरोपी त्याच परिसरातील असल्याने मागील चार दिवसांपासून अपहृत तरुणीची रेकी करीत होते. तिचेच अपहरण करण्याचा ठाम निर्णय घेतला. बुधवार २० मार्चच्या रात्री अपहृत तरूणी कामावरून घरी जात असताना आधीच तयारीत असलेल्या आरोपी चेतनाने तिला अडविले. पिस्तूल दाखवून आम्ही एनआयएचे अधिकारी असल्याची बतावणी केली. तिला एनआयएची नोटीस दाखवून चौकशीसाठी यावे लागेल, असे सांगत तिचे अपहरण करून महाजनवाडीतील खोलीवर बंदीस्त करून ठेवले.
ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निमित गोयल, पोलीस उपायुक्त अनुराग जैन, सह पोलीस आयुक्त डॉ. अभिजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक हरीषकुमार बोराडे, संतोष राठोड यांच्यासह गुन्हे शाखा युनिट एकचे पथक, प्रतापनगर ठाण्याचे पथकाने केली.
अपहृत तरुणीने केला वडिलांना फोन
आरोपींनी अपहृत तरुणीचा मोबाईल ताब्यात घेतला. तिच्या वडिलांना फोन करून ३० लाखांची मागणी केली. पोलिसांची दीशाभूल करण्यासाठी आरोपी मराठी भाषिक असल्यानंतरही तो गुगलच्या मदतीने हिंदी आणि भोजपुरी भाषा बोलत होता. लोकेशन मिळू नये म्हणून तो रस्त्यात ठिकठिकाणी अपहृत तरुणीचा मोबाईल चालू बंद करायचा. अपहृत तरुणी ४८ तास त्यांच्या ताब्यात होती. संधी मिळताच तिने २२ मार्चला वडिलांना फोन केला. ‘मला एका ठिकाणी बांधून ठेवले आहे. हा कोणता परिसर आहे, याबद्दल माहिती नाही. माझी सुटका करा.’ मुलीच्या आवाजाने वडिलांच्या हृदयाची धडधड वाढली. त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
हेही वाचा…मेळघाटात एसटी बस दरीत कोसळली; दोन महिलांचा मृत्यू, २५ जण जखमी
असा घेतला शोध
अपहृत तरुणीचे वडिलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आणि क्षणाचाही विलंब न लावता तपास सुरू केला. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाईलचे तांत्रिक विश्लेषनात्मक परिक्षण करून तपास केला. याशिवाय अपहृत तरूणीचा मोबाईलचे लॅपटॉपला लिंक असल्याने लॅपटॉपमध्ये अपहृत तरूणीची ‘लोकेशन हिस्ट्री’ तपासली असता तिचे शेवटचे लोकेशन हिंगणा, एमआयडीसी परिसरात दिसून आले. सदर परिसरात लक्ष केंद्रित करून तपास केला. महाजनवाडीतील एका खोलीवर पोहोचले असता अपहृत तरूणी मिळून आली.