नागपूर : सावनेर तालुक्यातील वाकी लगतच्या द्वारका वॉटर पार्क, येथे कामठी येथील एका कुटुंबाला बाउन्सर व सुरक्षारक्षकांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आली. संबंधित कुटुंबीयांना तब्बल दीड तास एका खोलीत कोंडून ठेवण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोन महिलांना बेशुद्धावस्थेत नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेबाबत पाटणसावंगी पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पीडित कुटुंबीयांनी खापा पोलीस आणि डायल ११२ यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही कुठलीही मदत मिळाली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.शेवटी पीडितांनी थेट नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्याशी संपर्क साधत मदत मागितली .
काही दिवसांपूर्वीच रेव्ह पार्टी प्रकरण, गोळीबार यामुळे पोलीस ठाणे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आणि आता वॉटर पार्कमधील मारहाणीने खापाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.