नागपूर : हेरगिरी करून प्रतिस्पर्धी टोळी आणि पोलिसांना माहिती पुरवित असल्याच्या संशयातून दोघांनी एका मित्राला खंडणी मागितली. खंडणी न दिल्यामुळे त्याला धावत्या रेल्वेसमोर फेकून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणी तपासाअंती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेख अशफाक शेख मुस्ताक (२२, नाझीर कॉलनी, कोराडी) असे मृत युवकाचे नाव आहे. आरोपी बाबा टायगर ऊर्फ शेख मोहसीन शेख मुसा (गिट्टीखदान) हा कुख्यात गुन्हेगार असून त्याची टोळी आहे. त्याच्यावर खंडणी, हत्याकांडासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर कोराडी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

सलूनचे दुकान चालविणारा शेख अशफाक याने पोलिसांना माहिती दिल्यामुळेच कारवाई झाल्याचा संशय बाबा टायगरला होता. बाबा आणि असलम खान जमशेद खान (३४, ओमनगर) यांनी शेख अशफाकला बोलावले आणि पोलिसांची हेरगिरी करून माहिती दिल्याचा जाब विचारला. त्यासाठी २५ हजार रुपयांची खंडणी मागितली. अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी अशफाकने पैसे देऊन सुटका केली. ३० जुलैला बाबा टायगर आणि असलम खान हे अशफाकच्या दुकानात गेले. त्यांनी एक लाख रुपयांची खंडणी मागितली. अशफाने खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांनीही अशफाकला सल्फीयाबाद वस्तीमागील रेल्वे रुळावर नेले. पैसे न दिल्यास धावत्या रेल्वेसमोर फेकून देण्याची धमकी दिली. मात्र, अशफाकने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी अशफाकला धावत्या रेल्वेसमोर फेकून दिले.

हेही वाचा : राष्ट्रपतींची जगन्नाथ मंदिर भेट अचानक रद्द, ही आहे कारणे…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वेचा धक्का लागल्याने असलमही फेकला गेला. त्याच्या पायाला जबर दुखापत झाली. ‘रेल्वे रुळावर शौचास बसलो असता भरधाव रेल्वेच्या धडकेत अशफाकचा मृत्यू झाला’ असा जबाब त्याने कोराडी पोलिसांनी देऊन दिशाभूल केली. मात्र, दोन युवकांनी ती घटना डोळ्यांनी बघितली होती. त्यांनी कोराडी पोलिसांनी माहिती दिल्यामुळे घटना उघडकीस आली. पोलिसांनी कुख्यात गुंड बाबा टायगर आणि असलम खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.