नागपूर : नववर्षाला सुरुवात होण्यापूर्वीच उपराजधानीत २४ तासांत नवीन ११ करोनाचे रुग्ण आढळले. जिल्ह्यातील सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या एकाच दिवसात दुप्पट झाल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

नवीन रुग्णांमध्ये पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यात १२ वर्षीय मुलगी, १७ वर्षीय मुलगा, १५ वर्षीय मुलगा, १४ वर्षीय मुलगी, १५ वर्षीय मुलीचा समावेश आहे. ७० वर्षीय महिला, ५९ वर्षीय पुरुष, ७३ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरुष, ७१ वर्षीय पुरुष, ३६ वर्षीय महिलेतही करोनाचे निदान झाले. नवीन रुग्णांमुळे शहरातील सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या आता २२ वर पोहोचली आहे. ग्रामीणलाही करोनाचे २ सक्रिय रुग्ण आहेत. एकूण रुग्णांपैकी चार रुग्ण शहरातील विविध सरकारी व खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहे. परंतु या रुग्णांची प्रकृती स्थिर असून कुणालाही प्राणवायूही लागले नसल्याचा महापालिकेतील आरोग्य विभागाचा दावा आहे. दरम्यान, शुक्रवारीही नागपूर महापालिकेला जनुकीय तपासणीचा अहवाल मिळाला नाही. त्यामुळे एका जनुकीय चाचणीला आठवड्याहून जास्त काळ लागत असल्यास ही चाचणी करून फायदा काय, हा प्रश्न या क्षेत्रातील जाणकार उपस्थित करत आहेत.

हेही वाचा – वनखात्याच्या विश्रामगृहात आग, व्हीआयपी कक्ष जळाला

४६ करोना चाचणी केंद्र कार्यान्वित

नागपुरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ४६ करोना चाचणी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहेत. या केंद्रांवर सर्दी, खोकला, तापासह करोनाची लक्षणे असलेल्यांनी चाचणी करण्याचे आवाहन नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले आहे. करोनाच्या विषयावर महापालिकेत एक बैठकही झाली. बैठकीला वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, डॉ. गोवर्धन नवखरे, एम्स नागपूरच्या डॉ. मीना मिश्रा, नीरीचे डॉ. कृष्णा खैरणार, मेयोचे डॉ. नितीन शेंडे, डॉ. संजय गुज्जनवार आणि इतरही अधिकारी उपस्थित होते. बैठकीत साथरोग अधिकारी डॉ. नवखरे यांनी संगणकीय सादरीकरणातून शहरातील करोनाची माहिती दिली. यावेळी आंचल गोयल म्हणाल्या, करोनाच्या साखळीवर वेळीच नियंत्रण गरजेचे आहे. त्यासाठी संशयितांची चाचणी करून या रुग्णांना विलगीकरणात ठेवण्याची गरज आहे. हे रुग्ण वाढण्याचा धोका बघता रुग्णालयातील विलगीकरण आणि प्राणवायू रुग्णशय्या सज्ज ठेवण्याचेही निर्देश त्यांनी दिले. करोनाच्या नवीन जेएन १ उपप्रकाराला घाबरण्याची गरज नसून वेळीच उपचाराने हा आजार सहज बरा होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा – गडचिरोली : रानटी हत्तींच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार, आरमोरी तालुक्यातील शंकरनगरात मध्यरात्री थरार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे आहेत चाचणी केंद्र

लक्ष्मीनगर झोनमधील खामला, कामगार नगर, जयताळा, सोनेगाव या यू.पी.एच.सी. मध्ये करोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. धरमपेठ झोनमधील फुटाळा, डीक दवाखाना (वनामती), तेलंगखेडी (सुदाम नगरी, वर्मा लेआऊट), के.टी. नगर, हजारी पहाड, दाभा या यू.पी.एच.सी. केंद्रासह हनुमाननगर झोन, धंतोली झोन, नेहरूनगर झोन, गांधीबाग झोन, सतरंजीपुरा झोन, लकडगंज झोन, आशीनगर झोन, मंगळवारी झोनमधीलही बऱ्याच यू.पी.एच.सी. मध्येही करोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.