नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी दारूच्या नशेत एका सावजी हॉटेलमध्ये जेवणाच्या कारणावरून तोडफोड केली. तसेच हॉटेलमालकाला मारहाण केली. मंगळवारी दुपारी चार वाजता झालेल्या या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली. हुडकेश्वर पोलिसांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रामचंद्र रोहनकर आणि भूषण अशी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हुडकेश्वर हद्दीतील पिपळा फाटा परिसरात निमजे सावजी हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये नेहमी पोलीस कर्मचारी जेवण करायला जात असतात. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार रामचंद्र रोहनकर आणि भूषण हे दोघेही दारूच्या नशेत निमजे सावजी हॉटेलमध्ये गेले. तेथे त्यांनी हॉटेलमालकाला जेवण तयार करण्यास सांगितले. त्यावरून हॉटेल मालक आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला.

हेही वाचा…“रश्मी बर्वे यांना उमेदवारी देणे हे काँग्रेसचे षडयंत्र,” उदय सामंत यांचा आरोप; म्हणाले, “काँग्रेस महिलांवर अन्याय..”

दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी हॉटेलमालकाला मारहाण केली आणि हॉटेलमध्ये तोडफोड करण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला. तसेच मद्याच्या धुंदीत असलेल्या पोलिसांना रस्त्यावरून नीट चालताही येत नव्हते. पोलीस कर्मचाऱ्यांचे नागरिकांनी छायाचित्र आणि चित्रफीत तयार करून समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या. त्यामुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलीन झाली.