यवतमाळ : घरगुती कारणावरून वृद्धाची तर जुन्या वादातून नेपाळमधील युवकाची हत्या करण्यात आली. दोन दिवसात राळेगाव तालुक्यात घडलेल्या या दोन घटनांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील दोन्ही मारेकऱ्यांना राळेगाव पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या मदतीने ताब्यात घेतले.

उकंडा शिवराम जांभुळकर (६०, रा. बंदर ता. राळेगाव) आणि अर्जुनसिंग (३० रा. नेपाळ ह.मु. राळेगाव) अशी मृतांची नावे आहेत. पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राळेगाव तालुक्यातील बंदर येथील विलास जांभुळकर याचा नातेवाईक असलेल्या उकंडा जांभुळकर यांच्यासोबत शनिवारी घरगुती कारणावरून वाद झाला होता. वादाच्या रूपांतर हाणामारीत झाल्याने उंकडा जांभुळकर गंभीर जखमी झाला. दरम्यान कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी राळेगाव पोलीस ठाण्यात प्रमोद जांभुळकर यानी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विलास जांभुळकर ( ३८, रा. बंदर ता. राळेगाव) याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता राळेगाव पोलिसांनी एलसीबीच्या मदतीने विलास याला जोडमोहा परिसरात असलेल्या सोनखास जंगल परिसरातून अटक केली.

हेही वाचा >>>“बुलढाण्यातून सुजात आंबेडकर यांनी लढावे किंवा स्थानिक उमेदवार द्यावा,” वंचितच्या बैठकीत ठराव पारित

दुसऱ्यात घटनेत, सोमवारी रंगपंचमीच्या दिवशी जुन्या वादातून चायनीजच्या दुकानात काम करणाऱ्या अर्जुनसिंग याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. गेल्या काही महिन्यापासून नेपाळ येथील अर्जुनसिंग हा राळेगाव शहरातील एका चायनीजच्या दुकानात काम करत होता. १० ते १५ दिवसापूर्वी अर्जुनसिंग याचा गावातील शांती नगरात राहणाऱ्या साहेबराव चव्हाण याच्यासोबत वाद झाला होता. या वादाचा वचपा काढण्यासाठी साहेबराव चव्हाण याने सोमवारी दुपारी तहसील कार्यालयामागे अर्जुनसिंग याची दगडाने ठेचून हत्या केली. या प्रकरणी राळेगाव पोलिसात साहेबराव चव्हाण याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता २४ तासाच्या आत राळेगाव पोलिसांनी साहेबराव चव्हाण याला अटक केली.