scorecardresearch

‘मेक इन गडचिरोली’च्या नावाखाली आमदार होळी यांनी कोट्यवधींनी फसवले; महिला व युवकांचा आरोप , आ. होळी यांनी आरोप फेटाळले

गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी ‘मेक इन गडचिरोली’ योजनेच्या नावाखाली युवक व महिलांची कोट्यावधींनी फसवणूक केली

‘मेक इन गडचिरोली’च्या नावाखाली आमदार होळी यांनी कोट्यवधींनी फसवले; महिला व युवकांचा आरोप , आ. होळी यांनी आरोप फेटाळले
गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी 'मेक इन गडचिरोली' योजनेच्या नावाखाली युवक व महिलांची कोट्यावधींनी फसवणूक केली

गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी ‘मेक इन गडचिरोली’ योजनेच्या नावाखाली युवक व महिलांची कोट्यावधींनी फसवणूक केली. योजनेचे व्यवस्थापक श्रीनिवास दोंतुला हे घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप फसगत झालेले युवक व महिलांनी पत्रपरिषदेत केल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात पोलिसातसुध्दा तक्रार दाखल करण्यात आली.

हेही वाचा >>> अपहरण केलेल्या मुलीला परत सोडायला आला अन्…! जमावाकडून अपहरणकर्त्याची हत्या

काही वर्षांपूर्वी भाजपचे आमदार डॉ. होळी यांच्या संकल्पनेतून ‘मेक इन गडचिरोली’ ही योजना सुरू करण्यात आली. या माध्यमातून जिल्ह्यातील युवकांना मत्स्योत्पादन, कुकुटपलान, राईस मील, पोक्लांड व जेसीबी घेण्यासाठी कर्ज, अगरबत्ती प्रकल्प, यासारखे उद्योग उभे करण्यासाठी एमआयडीसी परिसरात भूखंड, आदी १०० टक्के अनुदानावर मिळवून देऊ, असे आमिष दाखविण्यात आले. यासाठी गरजू युवक व महिलांकडून कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले. अनेकांनी खासगी कर्ज घेऊन उद्योग उभारण्यास सुरुवात देखील केली. मात्र, आमदारांनी सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के अनुदान मिळालेच नाही. उलट या तरुणांच्या नावावर लाखांची उचल करण्यात आली. अगरबत्ती उद्योग प्रकल्पातील प्रत्येक महिलांच्या नावे २ लाखांचे कर्ज उचलण्यात आले. आज बँकेचे कर्मचारी कर्ज वसूल करायला या युवक व महिलांच्या मागे तगादा लावत आहेत. जेव्हा की उद्योग उभारणीसाठी योजनेच्या नावाखाली या सर्वांकडून पैसे घेण्यात आले. मात्र, त्यानंतर ना अनुदान मिळाले ना ती योजना प्रत्यक्षात अमलात आली. फसगत झाल्याचे लक्षात येताच महिलांनी त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत करण्याची मागणी योजनेचे व्यवस्थापक श्रीनिवास दोंतुला आणि आमदार डॉ. होळी यांच्याकडे केली. मात्र, पैसे देण्यास ते टाळाटाळ करीत आहे. आमदारांनी मोठी सप्ने दाखवून अनेकांची फसगत केली. त्यामुळे आमचे संसार उघड्यावर पडले. फसवणूक करणाऱ्या आमदार डॉ. देवराव होळी व श्रीनिवास दोंतुला यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रपरिषदेत करण्यात आली. या आरोपामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून फसगत झालेले आणखी काही लोक पुढे येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> अमरावती : पालकमंत्र्यांना ‘स्‍पायडर मॅन’ सारखे फिरावे लागणार ; नाना पटोले यांची टीका

‘आरोप राजकीय हेतूने प्रेरित’
आमदार डॉ. होळी यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित असून ते निराधार असल्याचे म्हटले आहे. गडचिरोली जिल्ह्यात उद्योगाला चालना मिळावी म्हणून आपण मेक इन महाराष्ट्रच्या धर्तीवर ही योजना चालू करण्याचा प्रयत्न केला होता. यातून कोणाचीही फसवणूक केलेली नाही. त्यामुळे निरर्थक आरोप करणाऱ्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे डॉ. होळी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या