वर्धा: नोकरी नाही म्हणून स्वयंरोजगार निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले जाते. तसेच स्वतःच उद्योग टाकण्यास प्रेरित केल्या जाते. त्यासाठी शासन विविध स्वरूपात अनुदान पण देत असते. ग्रामीण भागात असे विविध उद्योग उभे राहले असून त्यात पोल्ट्री फार्म हा व्यवसाय बऱ्या पैकी बहरल्याचे चित्र दिसून येते. प्रत्येक जिल्ह्यात असे पोल्ट्री फार्म मोठ्या संख्येत आहे. मात्र रोजगार निर्मिती करणारा हा व्यवसाय लोकांच्या जीवावर उठत असल्याची भावना एका गावात पसरत चालली आहे.

समुद्रपूर तालुक्यातील चिखली उमरी येथे हा पोल्ट्री फार्म म्हणजेच कुक्कुट पालन व्यवसाय आहे. त्याच्या विरोधात शासनाकडे तक्रारी जात आहे. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. परिणामी गावातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहे. गावातील लहान मुले, वृद्ध व अन्य दुर्गंधी पसरल्याने आजारी पडत आहे.

गावकरी म्हणतात उमरी येथील प्रदीप मिलमीले यांचा सहा वर्षीय मुलगा यांस त्यामुळेच आजार बळावला. कुक्कुट पालणातील दुर्गंधीमुळे त्याला श्वास घेणे कठीण झाले. तो सतत आजारी पडतोय. म्हणून त्याची रक्त तपासणी केली. तेव्हा त्यात दोष आढळून आलेत. आजार बळावल्याने या सहा वर्षीय मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सूरू आहे. ही बाब गंभीर असून त्यास पोल्ट्री फार्मच जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.

राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात गावाकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन दिले आहे. त्यात हा पोल्ट्री फार्म हटविण्याची मागणी करण्यात आली. वांदिले म्हणतात की हा पोल्ट्री फार्म गावाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. गावात आजार व शेती करणे कठीण झाले आहे. त्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न करीत वांदिले यांनी या पोल्ट्रीची परवानगी त्वरित रद्द करण्याची मागणी केली.

सदर पोल्ट्री फार्ममुळे निर्माण होत असलेला धोका पाहून तो त्वरित हटविण्याची मागणी करतांनाच आंदोलन करण्याचा ईशारा पण देण्यात आला. जर तात्काळ कारवाई नं झाल्यास गावकरी रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करणार व त्याची जबाबदारी शासनाची राहील, असा ईशारा पण पक्षाचे तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, शहराध्यक्ष बालू वानखेडे, उपसरपंच विठ्ठल नन्नावरे, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष ईश्वर पोफळे तसेच प्रतिष्ठित नागरिक सुनील डोंगरे, उमाकांत पोफळे, किशोर डुकरे, प्रभाकर मिलमीले, खुशाल ताजने, पुरुषोत्तम सालवाटकर आदिनी दिला आहे.