वर्धा: गत ४० वर्ष सामंजस्याचे राजकारण अनुभवणाऱ्या आर्वी मतदारसंघात वर्षभरापासून संघर्षमय राजकीय वाटचालीचे चित्र उभे झाल्याचे दिसून येत आहे. आमदार दादाराव केचे यांचा पत्ता कट करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ही ओळख असलेले सुमित वानखेडे हे बंड शमवून उमेदवारी घेऊन आले. ते येणारच हे गृहीत धरून केचे यांनी विविध कार्यक्रमातून उघड तोफ डागणे सूरू केले होते. पण वानखेडे बाजी मारून गेले. आमदार झाले. तर माजी झालेल्या केचेंना विधान परिषदेवर घेत भाजप धुरीणांनी समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला.
पण भाजपचेच दोन आमदार म्हणजे एकाच म्यानात दोन तलवारी अशी स्थिती होणार असल्याचे भाकीत त्याचवेळी करण्यात आले होते. आता त्याचे उघड दर्शन सूरू झाले आहे. निमित्त रस्ता दुभाजकाचे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण बांधत असलेल्या आर्वी तळेगाव रस्त्याचे रखडलेले काम अखेर मार्गी लागले. मात्र केवळ गावातून जाणाऱ्या रस्ता दुभाजकाची रुंदी अकस्मात आक्रसली आणि वाद पेटला. सर्वत्र अडीच फुटी असलेले दुभाजक केवळ एक फुटाचे करण्यात आले. इस्टीमेट सोडून हे असे काम कां ? असा सवाल डागत केचे यांनी रस्त्यावर उतरून के काम बंद पाडले. त्याची सर्वत्र चर्चा झाल्यावर संबंधित वरिष्ठ घटनास्थळी आले. तेव्हा हे चुकीचे काम कां व कोणाच्या सूचनेने होत आहे असा सवाल केचे यांनी केल्यावर अधिकाऱ्यांनी एका ठेकेदारकडे बोट दाखविले. हा कोण लावला सूचना करणारा असा प्रतिप्रश्न केल्यावर अधिकारी निरुत्तर. आता करायचे काय, असा पेच. म्हणून गावातील काही सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी मंडळींनी एकत्र येत संघर्ष समिती स्थापन केली.
विश्रामगृहवार चांगलीच गरम चर्चा झडली. प्रत्यक्ष वानखेडे व केचे यांचे नाव नं घेता झालेल्या या चर्चेत दुभाजक हे अडीच फुटाचेच व्हावे असा सूर निघाला. मात्र काम बंदच पडले आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय अजमिरे म्हणतात की ,रस्ता दुभाजक अडीच फुटाचेच व्हावे असा सूर आहे. केचे यांची भूमिका स्पष्ट तर वानखेडे यांनी जनमताच्या बाजूने राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र तिढा वाटतो तेव्हढा सोपा नसल्याचे म्हटल्या जात आहे. संघर्ष समिती कोणाच्या बाजूची नाही तर अडीच फूटावर अडून आहे. वाद नको म्हणून समिती विना अध्यक्ष राहणार. या बाबत झालेल्या सभेत दशरथ जाधव, पंकज गोडबोले, विजय वाघमारे, हेमंत काळे, मनीष उभाड, बाळा नांदुरकर, दिलीप ठाकरे, राजपाल भगत, गौतम कुंभारे, विनय डोळे, विजय अजमिरे, शाबीर परवेज खान, सूर्यप्रकाश भट्टड, सतीश शिरभाते, गोपाल छंगाणी व सर्व स्थानिक पत्रकार उपस्थित होते.