वर्धा : कष्टाच्या कमाईतून थोडी बहुत बचत साधण्याचा सामान्य माणूस प्रयत्न करीत असतो. बचत किंवा गुंतवणूक यासाठी श्रीमंत मंडळींचे विविध मार्ग असतात. मात्र सामान्य किंवा गरीब वर्ग बँक, पतसंस्था किंवा पोस्ट खात्यात जमापुंजी टाकतो. त्यातही ग्रामीण भागात तर दैनंदिन ठेव, बचत,मुदत ठेवीसाठी पोस्ट खात्यावरच विश्वास ठेवल्या जात असल्याचे दिसून येते. आणि त्यावरच जर डल्ला मारला जात असेल तर ?
या प्रकरणात तसेच झाल्याचे म्हटल्या जात आहे. सेलू तालुक्यातील बोरी कोकाटे या लहानश्या खेड्यात पोस्ट ऑफिस आहे. या पोस्टातील बचत खात्यात विविध खात्यात ठेवण्यात आलेली रक्कम लंपास करण्यात आल्याची तक्रार झाली आहे. पोस्टमास्टरनेच हा प्रकार केल्याचा आरोप आहे. त्याने याच गावातील दोघांना हाताशी घेत गैरप्रकार केला. पोस्टातील अनेकांच्या खात्यात हा घोटाळा करण्यात आला. अनेकांच्या खात्यातील रक्कम परस्पर उचलण्यात आली आहे. आणि विशेष म्हणजे ज्या खातेदारांच्या खात्यात रक्कमच नाही, अश्याच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे दिसून आले.
एक खातेदार नंदलाल पाटील यांच्या खाते पुस्तिकेत खाडाखोड दिसून आली. नोंदी गहाळ करण्यात आल्यात. हा प्रकार पोस्ट मास्टरनेच केल्याचा आरोप झाला. ही बाब उजेडात येताच काही खातेदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. रीतसर तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच चौकशी सूरू झाली. तेव्हा अचानक काहींच्या खात्यात मोठी रक्कम पण जमा झाल्याचे पोलिसांना दिसून आले. तेव्हा काही खरे नाही हे दिसताच हा पोस्ट मास्टर गावातून बेपत्ता झाल्याचे दिसून आले. सेलू पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहे.
मात्र रक्कम लंपास होण्याचा प्रकार गावात खळबळ निर्माण करणारा ठरत आहे. कारण हे बोरी कोकाटे हे एक लहान गाव असून पोस्ट ऑफिसवरच विश्वास ठेवून शेतकरी, शेतमजूर वर्ग आर्थिक व्यवहार करतो. तसेच बड्या मंडळींचे पण याच ठिकाणी व्यवहार होत असतात. लंपास केलेली रक्कम किती, याचा नेमका आकडा पुढे आलेला नाही. पण लाखोच्या घरात तरी ही रक्कम असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गावात बँक शाखा नसल्याने बहुतांश व्यवहार पोस्टातच होतात. सध्या शेतीचा हंगाम आहे. त्यामुळे विविध खर्चासाठी आता शेतकऱ्यांना पैसा लागतो. आता कुंपणानेच शेत खाल्ले तर जायचे कुठे, असा प्रश्न गावाकऱ्यांना पडला आहे.