वर्धा : गणेश विसर्जनाची डॉक्टर मंडळी काढत असलेली मिरवणूक जिल्ह्याचे आकर्षण असते. सावंगी येथील मेघे अभिमत विद्यापीठाच्या गणेशोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस आहे. गावातले गणपती उठले की सावंगीचा राजाला निरोप द्यायला मग गाव लोटतो. सावंगी ते पवनार अशी ही मिरवणूक दुपारी चार वाजता सुरू होते. ढोलताशे, लेझिम पथक, लोककलेचा आविष्कार,आरोग्य देखावे हे वैशिष्ट्य असते. पण लक्ष वेधतात ते भावी डॉक्टर्स. वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, नर्सिंग, फिजिओथेरिपी या शाखेचे दीड हजारावर मुलं-मुली आपल्या नृत्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत असतात. त्यामुळे ही मिरवणूक कमी व शोभायात्रा अधिक असते. हेही वाचा : चंद्रपूर: जिल्हा परिषदेच्या ४७५ शाळांना लागणार टाळे? सायंकाळ होताच या यात्रेत हजारो दीप उजळून निघतात. बाप्पांचा जयजयकार करीत वाटेत नागरिकांना प्रसाद वाटप सुरू राहते. कसलाही गोंधळ होवू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतोच, पण कुलगुरुसह सर्व शाखेचे एकुणएक प्राध्यापक यात्रेवर करडी नजर ठेवून असतात. कुलपती दत्ता मेघे यात्रेच्या अग्रभागी राहून लोकांना अभिवादन करीत सामील होतात. हा सर्व माहौल पाहण्यास शहरवासियांसोबतच लगतच्या गावातील बायाबापडे येत असल्याने शहर गजबजून निघते.