अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने वाशीम मतदारसंघात भाकरी फिरवली आहे. विद्यमान आमदार लखन मलिक यांचे पक्ष नेतृत्वाने तिकीट कापले. त्यांच्या जागी भाजपने पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव श्याम खोडे यांना वाशीममधून संधी दिली. आपल्याला डावलल्याचे कळताच भाजपचे आमदार लखन मलिक ढसाढसा रडायला लागले. पक्षाने माझ्यावर अन्याय केला असून कार्यकर्त्यांशी बोलून पुढील भूमिका ठरवणार असल्याचे लखन मलिक यांनी सांगितले. वाशीम मतदारसंघात भाजपने बदल केल्यामुळे पक्षांतर्गत असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाशीम मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघाचे भाजप आमदार लखन मलिक प्रतिनिधित्व करीत आहे. २००९ पासून सलग तिनदा ते निवडून आले आहेत. त्यापूर्वी १९९० मध्ये देखील ते विजयी झाले होते. वाशीम जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ आमदार असताना पक्षाने त्यांच्यावर आता विश्वास दाखवलेला नाही. लखन मलिक यांच्यावर निष्क्रियतेची टीका सातत्याने झाली. वाशीममध्ये पक्षांतर्गत देखील त्यांच्याविषयी तीव्र नाराजी होती. त्यामुळे लखन मलिक यांचे तिकीट कापले जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. अखेर भाजपने त्यांना उमेदवारी नाकारून नवा उमेदवार दिला आहे.
हेही वाचा – प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, डोसा आणि विक्रम, काय आहे वाचा
भाजपमध्ये वाशीम मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा होती. अनेक जण इच्छुक होते. अखेर पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव श्याम खोडे यांच्या गळ्यात भाजपने उमेदवारीची माळ टाकली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी तयारी सुरू केली आहे. वाशीममध्ये भाजपने विद्यमान आमदारांचे तिकीट कापल्याने पक्षांतर्गत गटबाजी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा – महिला पोलीस उपनिरीक्षकाचा आक्षेपार्ह ‘व्हिडिओ व्हायरल’
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने वाशीम मतदारसंघात भाकरी फिरवली आहे. विद्यमान आमदार लखन मलिक यांचे पक्ष नेतृत्वाने तिकीट कापले. त्यांच्या जागी भाजपने पक्षाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव श्याम खोडे यांना वाशीममधून संधी दिली. आपल्याला डावलल्याचे कळताच लखन मलिक रडायला लागले. pic.twitter.com/GqX8EniztW
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— LoksattaLive (@LoksattaLive) October 27, 2024
पक्ष नेतृत्वाने आपले तिकीट कापल्याची माहिती मिळताच आमदार लखन मलिक यांचे अश्रू अनावर झाले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. पक्षाच्या तिकिटावर आपण चार वेळा वाशिममधून निवडून आलो आहोत. आपल्यावर कुठल्याही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. विकास कामे केली आहेत. वरिष्ठांच्या नेतृत्वात पक्ष वाढीचे देखील कार्य केले. तरीदेखील पक्ष नेतृत्वाने आता आपल्यावर अन्याय केला. उमेदवारी देताना डावलले. आता कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपली पुढील भूमिका ठरवणार आहे, असे लखन मलिक यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा येत होत्या.