यवतमाळ : मारेगाव तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या पांढरदेवी येथे गायगोधन यात्रा बघण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीस जंगलात नेवून तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उजेडात आली. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून, मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून नराधम आरोपी कैलास सूर्यभान आत्राम ( २८, रा. आवळगाव, ता. मारेगाव) यास पोलिसांनी अटक केली.
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बलीप्रतिपदेस पांढरदेवी गायगोधन उत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते. पंचक्रोशीतील नागरिक या यात्रेत गर्दी करतात. बुधवारी यात्रेत शेकडो लोक सहभागी झाले होते. त्यामुळे पोलिसांचाही मोठा बंदोबस्त होता. पीडित अल्पवयीन मुलगी पांढरदेवी गावाजवळच्या एका गावातून आपल्या तीन मैत्रिणीसह यात्रेत सहभागी होण्यासाठी आली होती. गर्दीमुळे चारही मैत्रिणींमध्ये ताटातूट झाली. पीडित मुलगी मैत्रिणीचा शोध घेत असताना आरोपी कैलास आत्राम याने तिला हेरले. तिला मैत्रिणीचा शोध घेण्याच्या बहाण्याने गर्दीपासून दूर नेले. यावेळी बालिकेने मदतीसाठी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपीने तिला धमकावून, तोंड दाबून गावालगतच्या जंगलात ओढत नेले. तिथे तिच्यावर बळजबरीने पाशवी अत्याचार केला.
आरोपी दुसऱ्यांदा अत्याचार करण्याच्या तयारीत असताना बालिकेने संधी साधून त्याच्या तावडीतून पळ काढला. नराधमाने तिचा पाठलाग केला, मात्र ती हातात न आल्याने त्यानेही जंगलात पळ काढला. पीडितेने गावात पोहचून काकांना घडलेली घटना सांगितली. त्यांनी तिच्या आई, वडिलांना माहिती दिली. आई, वडिलांनी मारेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पीडित बालिकेला आरोपीचे नाव माहीत नव्हते. केवळ, तो गावात येत असल्याने चेहरा परिचयाचा होता. बालिकेने सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीचा शोध घेत, त्याला अटक केली. आरोपी कैलास आत्राम याला दारूचे व्यसन असल्याने ती पीडित बालिकेच्या गावात नेहमी दारू पिण्यासाठी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे, आरोपी पूर्वीपासूनच बालिकेच्या मागावर असल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी कैलास आत्राम याने गुन्ह्याची कबुली दिली. अधिक तपास मारेगाव पोलीस करत आहे.
मारेगाव तालुक्यात अवैध दारूविक्री होत नसल्याचा दावा पोलीस करत असताना, दारूच्या व्यसनातून एका बालिकेवर पाशवी अत्याचार झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध फास्टट्रॅक कोर्टात खटला दाखल करून, पीडितेला न्याय देण्याची मागणी होत आहे.
