नागपूर : महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. घरगुती हिंसाचार, अपहरण आणि लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. कौटुंबिक अत्याचाराच्या घटनांची सरासरी काढली तर प्रत्येक तीन गुन्ह्यांमागे एक गुन्हा घरगुती हिंसाचाराचा आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडून ही आकडेवारी समोर आली आहे.
राज्यात २०२२ मध्ये महिलांविरुद्धच्या कौटुंबिक अत्याचाराची ४८ हजार ७५५ प्रकरणे नोंदवली गेली. त्या तुलनेत २०२३ मध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक सारख्या महानगरांमध्ये ५१,३९३ महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले. २०२२ च्या तुलनेत ही संख्या ५.४ टक्क्यांनी वाढली.
२०२३ मध्ये एकट्या पुण्यात महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये पाच टक्के वाढ झाली. नागपूर पोलिसांनी २०२३ मध्ये महिलांसाठी समाधान आणि शक्ती या दोन मोहिमा राबवल्या. त्यामुळे महिलांकडून तक्रार नोंदवण्याचे प्रमाण वाढले. यातून नागपूरचा सरासरी गुन्हेगारी दर हा ४. ८ टक्के वाढला. विशेषतः बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रकरणे वाढली. महिलांच्या कौटुंबक छळाच्या प्रकरणांत ७ तर अपहरणात ५ टक्के वाढ झाली. बाल लैंगिक शोषणाशी संबंधित गुन्हयांचे प्रमाणही १० टक्के वाढले.
मुंबईतही सायबर गुन्हे, फसवणूक आणि महिलांविरुद्ध गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. पोलिसांकडून आरोपपत्र दाखल होण्याचा दर ९० टक्के नोंदवला गेला. शैक्षणिक आणि आयटी हब झालेल्या पुण्यात सायबर फसवणूक, छेडछाड, ऑनलाईन गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणे वाढली. पुण्याचा आरोपपत्र दाखल होण्याचा दर राज्यात सर्वाधिक म्हणजे ९४ टक्के आहे. नागपुरात २०२३ मध्ये एकूण २४ हजार ३६ गुन्हे नोंदवले गेले. नागपूरचा दर ८४ टक्के नोंदवला गेला. यात हिंसक गुन्हे १,४६८, खून ७९, महिलांविरुद्ध अत्याचार १,५५६ आणि अल्पवयीनांकडून गुन्ह्यांची २५४ प्रकरणे नोंदवली गेली.
देशातही महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ
देशभरात २०२३ मध्ये महिला अत्याचाराची ४ लाख ४८ हजार २११ प्रकरणे नोंदवली गेली. यात सरासरी ०.७ टक्के वाढ झाली आहे. यातही पती किंवा नातेवाईकांकडून छळाची १ लाख ३३ हजार ६७६ (२९.८टक्के), महिलांच्या अपहरणाची ८८ हजार ६०५ (१९.८), शारीरिक शोषणाची ८३ हजार ८९१ (१८.७) आणि बाल अत्याचाराची ६६ हजार २३२ (१४.८) प्रकरणे नोंदवली गेली. महिलांविरुद्ध गुन्हेगारी दर हा प्रती लाखात ६६.२ इतका आहे.
राज्यात २०२३ मध्ये अपहरणाची १ लाख १३ हजार ५६४ प्रकरणे नोंदवली गेली. २०२२ च्या तुलनेत यात ५.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अपहरण झालेल्या एकूण ८२ हजार १०६ बालकांपैकी १६,०३३ मुले तर ६६,०७२ मुली होत्या. त्या खालोखाल ३४ हजार २९८ प्रौढांपैकी ८,२५२ पुरुष तर २६ हजार०४२ महिला होत्या. यातील १ लाख ४० हजार ८१३ अपहृत व्यक्तींचा शोध पाेलिसांनी घेतला. यात १ लाख ३९ हजार १६४ जणांना वाचवण्यात आले. मात्र १ ६४९ जणांचे मृतदेहच सापडले.
