नागपूर : किमान तापमानात वाढ, तरीही हवेत गारठा. गार आणि बोचऱ्या वाऱ्यांनी बुधवारी उपराजधानीची पहाट उजाडली. हुडहुडी भरवणाऱ्या थंडीने डिसेंबर महिना नागपूरकरांना चांगलेच गारठावून सोडणार आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस तापमानात चांगलीच घट झाली होती. शहराचे तापमान ११ अंश सेल्सिअसवर तर विदर्भातील काही शहरांचे तापमान १० अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. आता किमान तापमानात वाढ झाली तरीही हवेतील गारठा मात्र वाढला आहे.
सामान्यत: डिसेंबर महिन्यात रात्रीचा पारा घसरण्याचे सत्र सुरू हाेते व कडाक्याची थंडी वाढते. सध्या पारा घसरला नाही, पण गारठा मात्र आहे. यावेळी थंडीला अधिक जाेर राहण्याची स्थिती असून दाेनदा थंडीची लाट सहन करावी लागण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.याच उपराजधानीने अलीकडेच काही वर्षांपूर्वी ३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेतली आहे. या काळात उत्तरेचा भाग हिवाळी पावसाने प्रभावित राहत असल्याने थंडे वारे मध्य भारताकडे प्रवाहित हाेत असल्याने थंडीत वाढ हाेते.
हेही वाचा: ताडोबातील ‘ती’ जखमी वाघीण आणि दोन बछडे सुरक्षित; रानडुकराची केली शिकार
सध्या ढगाळ वातावरणामुळे दाेन्ही तापमानात अंशतः वाढ झाली आहे. २४ तासात पारा वाढला असला तरी सरासरीपेक्षा ताे कमीच आहे. त्यामुळे दिवसा हलकी व रात्री कडाक्याच्या थंडीची जाणीव हाेत आहे. मात्र, डिसेंबर महिन्यात थंडीत वाढ होण्याची शक्यता देखील हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. हवामान अभ्यासक डॉ. अक्षय देवरस यांच्या अंदाजानुसार सात ते नऊ डिसेंबरदरम्यान तापमानात घसरण होऊन थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.