लोकसत्ता टीम

अमरावती : एप्रिलच्या सुरूवातीलाच उन्हाची दाहकता जाणवू लागली असून सद्यस्थितीत अमरावती विभागात ३१ गावांमध्ये ३९ टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक २० गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होऊनही कायमस्वरूपी उपाययोजना का होऊ शकल्या नाहीत, हा प्रश्न चर्चेत आला आहे.

पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये दरवर्षी ऑक्टोबर ते जून या कालावधीत पाणीटंचाई निवारण कार्यक्रम राबवला जातो. अमरावती विभागात गेल्या पाच वर्षांमध्ये या कार्यक्रमावर सुमारे २०० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. तरी पाणीटंचाईची तीव्रता कायम आहे. अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यात २० गावांमध्ये २२ टँकर, अमरावती जिल्ह्यात ६ गावांमध्ये १२ टँकर तर यवतमाळ जिल्ह्यात ४ गावांमध्ये ४ टँकर लागले आहेत. वाशीम जिल्ह्यात एका गावाला टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात अद्याप टँकर सुरू करण्यात आले नसले, तरी येत्या काही दिवसांत टँकरची व्यवस्था करावी लागणार आहे.

सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यात १२ टँकर सुरू असून त्या माध्यमातून नागरिकांची तहान भागवण्यात येत आहे. चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरा तालुक्यातील आकी, खडीमल, मोथा, लवादा, तारूबांदा येथे टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. या गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे अद्यापही झाली नसल्याने या गावांना टँकराद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपुर्वी दूषित पाण्यामुळे चिखलदरा तालुक्यातील पाचडोंगरी, कोयलारी या गावांमध्ये साथजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

दरवर्षी तात्पुरत्या नळ पाणी योजना, कूपनलिका, इतर पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित करणे, खासगी विहिरी अधिग्रहित करणे, टँकरने पाणीपुरवठा करणे यासारख्या उपाययोजना हाती घेतल्या जातात. पाणीटंचाईच्या परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्याच्या दृष्टीने सरकारने राज्यात ‘सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र’ असा नारा देत जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय २०१५ मध्ये घेतला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमरावती विभागात गेल्या तीन वर्षांत सुमारे ३ हजार १०६ गावे जलपरिपूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असताना, अनेक भागांत पिण्याच्या पाण्यासाठी चाललेली वणवण विरोधाभास स्पष्ट करणारी ठरली आहे. माणसांना पिण्याचे पाणी मिळत नाही, तेथे जनावरांना कुठून पुरवायचे, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. अनेक भागांतील विहिरी, नद्या, नाले आटले असून तलावांनीही तळ गाठला आहे. धरणांमधील साठाही झपाट्याने कमी होत आहे.