नागपूर: केंद्र सरकारने दुचाकी आणि चारचाकी संवर्गातील कमी क्षमतेच्या वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कमी केल्याचा सकारात्मक परिणाम होऊन यंदाच्या सणासुदीत देशात रोज १ लाखावर सगळ्याच संवर्गातील वाहनांची विक्री नोंदवली जात आहे. ऑक्टोंबर- २०२५ या महिन्यातील २२ दिवसांतच देशात तब्बल २३ लाख ५४ हजार २२५ वाहनांची विक्री नोंदवली गेली आहे. त्यामुळे देशातील ऑटोमोबाईल क्षेत्राला गती आल्याचे सकारात्मक चित्र आहे.

केंद्र सरकारने दुचाकी व कमी क्षमतेच्या चारचाकी वाहनांवरील जीएसटी कमी केल्याने वाहनांच्या किंमती सुमारे १० टक्यांनी कमी झाल्या आहे. त्याचा सकारात्मक परिणाम यंदाच्या सणासुदीत वाहन विक्रीवर होऊन ऑटोमोबाईल क्षेत्राला सुगीचे दिवस आलेले दिसत आहे. देशात जानेवारी ते २२ ऑक्टोंबर २०२५ दरम्यान २ कोटी ११ लाख १९ हजार ८४७ वाहनांची विक्री नोंदवली गेली. जानेवारी २०२५ या एका महिन्यात २३ लाख २१ हजार ६३२ वाहनांची विक्री झाली होती. ही संख्या त्यानंतर घसरून फेब्रुवारीत १९ लाख २३ हजार १३० होती.

दरम्यान एप्रिल २०२५ मध्ये पून्हा वाहन विक्री वाढून २३ लाख १७ हजार ४५० वर पोहचली. तर त्यानंतरच्या प्रत्येक महिन्यात १८.४४ लाख ते २० लाख दरम्यान महिन्याला वाहनांची विक्री नोंदवली गेली. परंतु सणासुदीचे दिवस असलेल्या ऑक्टोंबर महिन्यात दसरा आणि धनत्रयोदशीसह दिवाळीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात देशातील विविध भागात दुचाकी, चारचाकीसह इतरही संवर्गातील वाहनांची खरेदी केली. या काळात देशात २३ लाख ५४ हजार २२५ वाहनांची विक्री नोंदवली गेली. ऑक्टोबर महिन्यातील रोजची सरासरी काढल्यास १ लाख ७ हजार १० वाहन विक्री झाल्याचे केंद्र सरकारच्या भूपृष्ठ वाहतूक खात्याच्या वाहन या संकेतस्थळावरील आकडेवारीतुन ही माहिती पुढे आली आहे. निश्चितच वाहनांची विक्री वाढल्याने कर संकलन वाढून सरकारचा महसूलही वाढण्यात मदत झाली आहे.

सर्व संवर्गातील वाहनांच्या विक्रीती आकडेवारी (वर्ष २०२५)

महिना (२०२५)आकडेवारी
जानेवारी२३,२१,६३२
फेब्रुवारी१९,२३,१३०
मार्च२१,५५,३२२
एप्रिल२३,१७,४५०
मे२२,३५,९४८
जून२०,२४,८२०
जुलै१९,८२,३२८
ऑगस्ट१९,८५,१४०
सप्टेंबर१८,४५,५८३
ऑक्टोबर२३,५४,२२५
एकूण२,११,१९,८४७