नागपूर : इंडियन कोस्ट गार्डच्या अधिकाऱ्याने स्वेच्छानिवृत्तीनंतर ‘रिटायर्डमेन्ट प्लॅन’ची गूगलवरून माहिती घेतली. मात्र, ते माहिती घेताना चक्क सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकले. सायबर गुन्हेगाराने अधिकाऱ्याला अधिक परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करायला लावली व ४३ लाखांचा गंडा घातला. 

हितेंद्र लक्ष्मण पाटील (४५,न्यू खलासी लाईन, कामठी) हे इंडियन कोस्ट गार्ड येथे प्रधान अधिकारी असून त्यांची पोस्टिंग गुजरातमधील गांधीनगर येथे आहे. ते २०२६ नंतर स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या विचारात होते. सेवानिवृत्तीनंतर किती रक्कम मिळेल व ती रक्कम कुठे गुंतविल्या जाऊ शकते याबाबत त्यांनी अभ्यास सुरू केला. त्यांनी गूगलवर रिटायर्डमेन्ट प्लॅनची चाचपणी केली. त्यांनी काही संकेतस्थळांवर स्वत:ची माहितीदेखील अपलोड केली. त्यानंतक काही दिवसांतच त्यांना फोन येण्यास सुरुवात झाली. त्यांना जून महिन्यात विलियम नावाच्या व्यक्तीने ९२३३७५४५०९ या क्रमांकावरून फोन केला व हॉस्टेलवर्ल्डमीटदवर्ल्ड हे ॲप डाऊनलोड करायला सांगितले. या ॲपमध्ये रक्कम डिपॉझिट केल्यास काही कालावधीने चांगला नफा मिळेल व काही टास्क पूर्ण केल्यावर नफ्यासह पूर्ण रक्कम काढता येईल, असे समोरील व्यक्तीने सांगितले. त्यानंतर आरूषी नावाच्या एजंटने पाटील यांना टेलिग्रामवरून संपर्क केला व हॉटेल्सचे रेटिंग करण्याची प्रक्रिया सांगितली.

हेही वाचा >>>सावनेरातील रॉयल लॉजवर देहव्यापार, पोलिसांनी छापा टाकताच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरुवातीला पाटील यांनी १० हजार रुपये गुंतवले व त्यांच्या ॲपच्या खात्यावर ११ हजार रुपये जमा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पाटील यांचा विश्वास बसला व त्यांनी विविध टास्कच्या नावाखाली ३० जुलै ते २९ ऑगस्ट या कालावधीत ४३ लाख ८३ हजार रुपये जमा केले. त्यानंतर नफा दाखविणे बंद झाले. पाटील यांनी समोरील व्यक्तीला फोन करून पैसे परत मागितले. मात्र पैसे परत हवे असतील तर आणखी डिपॉझिट करावे लागतील, असे त्यांना सांगण्यात आले. आरोपींनी त्यांचे ॲपवरील खातेदेखील गोठविले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अखेर पाटील यांनी जुनी कामठी पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.