अकोला : रेल्वेतील आरक्षणाचा चार्ट सध्या गाडी रवाना होण्याच्या चार तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी रेल्वे मंडळाने प्रवासाच्या आठ तास आधी आरक्षण चार्ट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी येत्या १० जुलैपासून करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सर्व प्रवासी गाड्यांसाठी आठ तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया १० जुलैपासून अनिवार्य करण्यात आली आहे. गाड्यांचे प्रस्थान वेळ ०५:०० ते १४:०० वाजेपर्यंत प्रथम आरक्षण चार्ट मागील दिवशी रात्री २१:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांचे प्रस्थान वेळ १४:०० ते २३:५९ वाजेपर्यंत व ००:०० ते ०५:०० वाजेपर्यंत असल्यास प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या आठ तास आधी तयार करण्यात येईल. दुसरा आरक्षण चार्ट तयार करण्याच्या विद्यमान प्रावधानांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आठ तास आगोदर आरक्षण चार्ट तयार करण्यात येणार असल्याने प्रवाशांना अगोदरच नियोजन करणे सोपे जाईल. वर्तमान आरक्षण कोटा गाडीच्या प्रस्थानाच्या आठ तास आधी उपलब्ध असेल. प्रवाशांना त्यांच्या तिकिटाची स्थिती (कन्फर्म/वेटिंग/रद्द) लवकर समजू शकेल. काही वेळा एक दिवस आधी देखील ते स्पष्ट होईल. त्यामुळे पुढील नियोजन करणे सुलभ होईल. फक्त निश्चित तिकीटधारकच प्लॅटफॉर्मवर येतील. त्यामुळे फलाटावरील गर्दी कमी होईल आणि स्वच्छता राखण्यात मदत होईल. ही सुधारणा प्रवाशांना अंतिम क्षणी मिळणाऱ्या तिकिटांबाबत अधिक स्पष्टता व पारदर्शकता मिळवून देण्यासाठी करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

तिरुपती-हिसार विशेष गाडी धावणार

प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीचा विचार करून तिरुपती-हिसार दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्र. ०७७१७/०८८१८ तिरुपती- हिसार- तिरुपती साप्ताहिक विशेष गाडीच्या २४ फेऱ्या होणार आहेत. ९ जुलै ते २४ सप्टेंबरपर्यंत तिरुपती येथून दर बुधवारी २३.४५ वाजता सुटेल आणि हिसार येथे शनिवारी १४.०५ वाजता पोहोचेल. १३ जुलै ते २८ सप्टेंबरपर्यंत हिसार येथून दर रविवारी २३.१५ वाजता सुटेल आणि तिरुपती येथे बुधवारी ११.३o वाजता पोहोचेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गाडीला रेनिगुंटा, रझमपेट, कड्डुपा, येर्रगुंटला, ताडीपत्री, गुत्ती, गुंटकळ, धोन, कुर्नूल सिटी, गदवाल, महबूबनगर, जडचर्ला, काचीगुडा, मलकाजगिरी, मेडचल, कमारेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, वडोदरा, रतलाम, मन्दसौर, नीमच, चित्तौडगड, भीलवाडा, बिजैनगर, नसीराबाद, अजमेर, किशनगढ, फुलेरा जं, रिंगस जं, सीकर जं, नवालगढ, झुंझुनू, चिरावा, लोहारू आणि सादुलपूर येथे थांबा आहे. २० तृतीय श्रेणी वातानुकुलीत, दोन सामानवाहू व गार्ड ब्रेक व्हॅन्स अशी गाडीची रचना आहे.