नागपूर : भारतातील तेरा व्याघ्रप्रकल्पांना केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने धोक्याचा इशारा दिला आहे. यात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील व्याघ्रप्रकल्पांचा समावेश आहे.

प्रामुख्याने महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी आणि पेंच व्याघ्रप्रकल्प शिकाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा ‘अलर्ट’ देण्यात आला आहे. सात ते आठ वर्षांपूर्वी महाराष्ट्रात शिकाऱ्यांनी उच्छाद मांडला होता. मध्यप्रदेशातील कटनी येथील बहेलिया या शिकारी टोळ्यांनी मेळघाट, ताडोबा, पेंच या व्याघ्रप्रकल्पात मोठ्या प्रमाणात वाघांची शिकार केली. २० ते २५ वाघ यात मारले गेले. शंभराहून अधिक शिकाऱ्यांना अटक झाली.

हेही वाचा… चंद्रपूर : “निवडणुकीच्या तयारीला लागा”, वडेट्टीवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले, “खासदार, आमदार मी निवडून आणतो…”

यात महाराष्ट्रातील वनखात्याच्या काही अधिकाऱ्यांनी उत्तम कामगिरी बजावली. २०१६ नंतरही शिकाऱ्यांचा उच्छाद सुरूच होता. पण, बऱ्याच प्रमाणात त्यावर नियंत्रण आले आणि वनखाते निश्चिंत झाले. याचाच फायदा घेत शिकाऱ्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. मध्यप्रदेशातील सातपुडा व्याघ्रप्रकल्पातील चोरना गाभा क्षेत्रातील एका जलाशयात वाघाचा मृतदेह सापडला.

हेही वाचा… अखेर अजित पवारांना वर्धा जिल्ह्यात बडा साथीदार मिळाला

शिकाऱ्यांनी वाघाची मान कापली होती. या घटनेनंतरच केंद्रीय वन्यजीव गुन्हे शाखेने सर्व व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांना आणि अभयारण्यासह लगतच्या क्षेत्राशी संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क केले. संघटित शिकारी टोळ्या व्याघ्रक्षेत्राभोवती सक्रिय आहेत. विशेषत: सातपुडा, ताडोबा, पेंच, कार्बेट, अमनगड, पिलीभीत, वाल्मिकी, राजाजी आणि बालाघाट, गडचिरोली, चंद्रपूर यासारखे वाघांचे क्षेत्र शिकाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे तंबू, मंदिरे, रेल्वेस्थानक, बसस्थानके, पडक्या इमारती, सार्वजनिक निवारा स्थळे या ठिकाणी संशयित भटक्या लोकांची चौकशी करावी. संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवावी. तसेच पोलीस ठाण्याच्या संपर्कात राहून त्यांच्यासोबत माहितीची देवाणघेवाण करावी, असे निर्देश केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने दिले आहेत.

हेही वाचा… गोंदिया जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा कोण उचलणार? अजित पवार गटाकडून ३ हजार शपथपत्रांची तयारी

आधी ‘बहेलिया’, आता ‘बावरिया’

२०१३ ते २०१६ या कालावधीत मध्यप्रदेशातील कटनी येथील ‘बहेलिया’ या शिकारी टोळ्यांनी वाघांच्या शिकारी केल्या तर कातडी, अवयवांच्या तस्करीची जबाबदारी ‘बावरिया’ समूहाने पार पाडली. आता पंजाब, हरियाणा, राजस्थान येथील ‘बावरिया’ हा समूह तस्करी न करता थेट शिकारीत उतरला आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील जंगलाबाहेरच्या मोठ्या गावात त्यांनी बस्तान बसवले आहे. स्थानिक लोकांच्या ते संपर्कात असल्याची माहिती आहे.

हेही वाचा… शिक्षकी पेशा आता नको रे बाप्पा, डी.एड.साठी जागा रिक्तच राहणार

वनखाते अपयशी

सर्व राज्यात वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा स्थापन करण्याचे निर्देश २०१४ मध्येच देण्यात आले होते. याच धर्तीवर मध्यप्रदेशात ‘एसआयटी’ म्हणजेच विशेष तपास गट स्थापन करण्यात आला. महाराष्ट्रातही याचा पाठपुरावा करण्यात आला. २०१९च्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात प्रस्ताव देखील मांडला, पण त्याचे पुढे काहीही झाले नाही. काही मोजक्या अधिकाऱ्यांची कामगिरी वगळता वन्यजीवांच्या शिकारी रोखण्यात वनखाते अपयशी ठरले आहे. – यादव तरटे पाटील, माजी सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिकांना सोबत घेणे आवश्यक

केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने ‘अलर्ट’ दिला म्हणजे यात नक्कीच गंभीर आहे. यात काही विशिष्ट व्याघ्रप्रकल्प व वनक्षेत्राचा उल्लेख असला तरीही व्याघ्रकेंद्रीत सर्वच क्षेत्रांनी हा इशारा गांभीर्याने घ्यायला हवा. त्यासाठी गावातील लोकांसोबत बैठका घेऊन स्थानिक स्वयंसेवींना सोबत घेऊन काम केले तरच शिकारी थांबवता येणे शक्य आहे. – कुंदन हाते, माजी सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ