बोर्डिग पास घेण्यासाठी रांगा : – इंडिगोचे ‘सव्‍‌र्हर’ सोमवारी सकाळी नादुरुस्त झाल्याने विविध शहरातून नागपूरकडे येणाऱ्या आणि येथून जाणाऱ्या इंडिगोच्या विमानांना विलंब झाला. दरम्यान, दुपारनंतर सव्‍‌र्हर पूर्ववत करण्यात आले. पण प्रवाशांनी विमानतळाकडे निघण्यापूर्वी उड्डाणाची स्थिती तपासून घ्यावी, असा सल्ला इंडिगोने दिला आहे.

देशांतर्गत सेवा देणारी सर्वात मोठी नागरी विमान वाहतूक कंपनी इंडिगोचे सव्‍‌र्हर सोमवारी ठप्प झाले होते. यामुळे नागपूरसह अनेक शहरांमधील विमानतळांच्या काऊंटरवर प्रवाशांची गर्दी झाली होती. परिणामी, तिकीट खिडकीवर बोर्डिग पास घेण्यासाठी प्रवाशांच्या रांगा दिसून आल्या. पुणे विमानतळावर तर दोन प्रवाशांना एकाच क्रमांकाचे आसन दिल्याने गोंधळ उडाला. नंतर ही चूक दुरुस्त करण्यात आली. देशभरातील इंडिगोच्या सेवेवर परिणाम झाला. पण सव्‍‌र्हर निकामी होण्यामागचे कारण कळू शकलेले नाही.

दिल्ली, पुणे, चेन्नई, मुंबई, बंगळुरूहून नागपूरला येणारी विमाने ४५ ते दीड तास विलंबाने आली. विमाने विलंबाने आल्याने नागपूरहून दिल्ली, चेन्नई, मुंबई, पुणे, कोलकाताकडे जाणारी विमाने उशिरा निघाली. सव्‍‌र्हरच काम करत नसल्याने बोर्डिग पास देताना गोंधळ तर उडालाच पण, प्रवाशांना विमानाची स्थिती देखील नीट सांगता येत नव्हती.  सव्‍‌र्हर दुरुस्त करण्यात आले आहे. मात्र, देशभरातील विमानांचे संचालन विस्कळीत झाले. त्यामुळे उड्डाणाची अद्ययावत स्थिती जाणून घेत राहावे, असे आवाहन इंडिगो कंपनीने ट्विटद्वारे केले.

सहा विमाने विलंबाने

इंडिगोची नागपुरात येणारी ६ ई-५६३ चेन्नई-नागपूर, ६ ई-५३८८ मुंबई-नागपूर, ६ई-४०३ मुंबई-नागपूर  आणि येथून उडणारी ६ई-१३४ नागपूर-नवी दिल्ली, ६ई-५७१ नागपूर-चेन्नई, ६ई-५३८९ नागपूर-मुंबई आदी विमानांना ४५ ते दीड तास विलंब झाला.

दिल्लीतील प्रदूषणाचा फटका

दिल्लीतील प्रदूषण मोठय़ा प्रमाणात वाढले असून तेथील विमानतळावरील दृष्यमानता आवश्यकतेपेक्षा कमी झाली आहे. त्याचा फटका विमान वाहतुकीला बसला आहे. अजून कडाक्याची थंडी पडलेली नाही तरी प्रदूषणामुळे दिल्लीतून देशभरातील शहरात उडणारी विमाने उशिराने निघत आहेत. त्याचा परिणाम नागपूर विमानतळावर दिसून आला. रविवार व सोमवारी दिल्लीकडे जाणारी आणि तेथून नागपुरात येणारी विमाने उशिरा येत होती आणि उशिरा परत जात होती.