नितीन गडकरींनी कान टोचले ; ९९ वा वर्धापन दिन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : विदर्भ साहित्य संघाचा इतिहास हा आपल्यासाठी गौरवशाली आणि प्रेरणादायी आहे. मात्र संघाच्या कार्यपद्धतीत गेल्या काही वर्षांत  साचलेपणा आला आहे. साहित्य संघाचा हा इतिहास अधिक प्रबळ व्हावा, वि.सा. संघ ही चळवळ अजून लोकाभिमुख व्हावी आणि त्यातून समाजात जागरूकता निर्माण व्हावी  त्यादृष्टीने शतक महोत्सवी वर्षांनिमित्ताने विदर्भ साहित्य संघाने  विचार करावा, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

विदर्भ साहित्य संघाचा ९९ वा वर्धापन दिन व शतकमहोत्सवी वर्षांच्या शुभारंभाप्रसंगी गडकरी बोलत होते. शुक्रवारी आभासी पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला महापौर दयाशंकर तिवारी, दंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे, डॉ. उषा देशमुख, सरचिटणीस विलास मानेकर, कायाध्र्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, आशुतोष शेवाळकर  आदी पदाधिकारी उपस्थित होते.  डॉ. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी.डी. पाटील आभासी पद्धतीने सहभागी झाले होते. यावेळी उषा देशमुख यांना ग.त्र्यं. माडखोलकर  जीवनव्रती पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह, २५ हजार रुपयाचा धनादेश, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी गडकरी म्हणाले, विदर्भ साहित्य संघ हा फक्त नागपूरपुरता मर्यादित नाही, तर त्याच्या शेकडो शाखा निर्माण झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांत ही साहित्य चळवळ अधिक व्यापक होणे अपेक्षित होते पण ती झाली नाही. या चळवळीमध्ये स्थितिशीलता आली असून ती अधिक विशाल व गतिशील आणि सर्वव्यापी व्हावी अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली. राजकारण्यांनी साहित्यिकांच्या कार्यात लुडबूड करू नये असे मला वाटते.  साहित्य संघाच्या वर्षांचा इतिहास विदर्भातील साहित्यिक चळवळीला दिशा देणारा आहे. ग. त्र्यं. माडखोलकर, राम शेवाळकर यांच्यासारख्या थोर साहित्यिकांनी वि.सा. संघाला अतिशय योग्य मार्गदर्शन केले. तसेच मनोहर म्हैसाळकर यांनीही वि.सा. संघाचे यशस्वी नेतृत्व केले.    प्राचार्य राम शेवाळकरांचे व्यक्तिमत्त्व आजही विसरू शकणार नाही. आता तंत्रज्ञानाचा उपयोग करून साहित्य क्षेत्रातही  बदल झाले पाहिजे. प्राचार्य राम शेवाळकर यांचे एक स्मारक अंबाझरी मागार्वर व्हावे, अशी इच्छा व्यक्त करताना स्मारकासाठी नागपूर सुधार प्रन्यास जागा देऊन बांधून देण्यास तयार आहे. या स्मारकासोबतच तेथे मराठीची ई लायब्ररी व्हावी व  भविष्यातील नेत्यांमध्ये वक्तृत्व विकसित करण्यासाठी प्रशिक्षण संस्था रामभाऊंच्या नावाने सुरू व्हावी, त्या दृष्टीने येणाऱ्या दिवसात त्यांला मूर्तरूप देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे गडकरी म्हणाले.

शतक महोत्सवाचे उद्घाटन करताना पी.डी. पाटील म्हणाले, मनोहर म्हैसाळकर यांना कुशल संघटक व प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून अनुभवता आले.  महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले,  राम शेवाळकर स्मृतीनिमित्त सुधार प्रन्यास प्रकल्प स्मारक तयार केले जाणार असून त्यात महापालिका  सहकार्य करेल.  यावेळी डॉ. पिनाक दंदे म्हणाले, विदर्भ साहित्य संघाशी माझा संबंध कमी आला. वडील गंगाधर दंदे यांचे साहित्य संघाशी ऋनानुबंध आहेत. त्यामुळे शतकमहोत्सवी वर्षांनिमित्त  सर्वतोपरी सहकार्य करेल. अध्यक्षीय भाषणात मनोहर म्हैसाळकर म्हणाले, या शतकमहोत्सवी वर्षांतील वाटचालीत केवळ माझे एकटय़ाचे नाही अनेकांचे हात लागले आहेत. प्रास्ताविक प्रकाश एदलाबादकर यांनी तर शलाका जोशी यांनी संचालन केले. रवींद्र शोभणे यांनी उषाताई देशमुख यांचा परिचय करून दिला. आभार विवेक अलोणी यांनी मानले. सत्काराला उत्तर देताना उषाताई देशमुख म्हणाल्या, मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा आणि त्यासाठी विदर्भ साहित्य संघासारख्या साहित्य संस्थांनी पुढाकार घ्यावा. उषाताई देशमुख यांचे भाषण रवींद्र शोभणे यांनी वाचले. गिरीश गांधी, डॉ. दंदे, आशुतोष शेवाळकर महोत्सव संरक्षकपदी गिरीश गांधी, डॉ. पिनाक दंदे, आशुतोष शेवाळकर यांची महोत्सव संरक्षक म्हणून निवड  करण्यात आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Integrity workings glorious inspirational ysh
First published on: 15-01-2022 at 00:09 IST