लोकसत्ता टीम

नागपूर : पोलिस उपनिरीक्षकांच्या कामाविषयी जरी समाजात आकर्षण असले तरी या परीक्षेच्या तांत्रिकतेविषयी मात्र विद्यार्थ्यांना खूप कमी माहिती आहे. राज्य शासनाच्या मागणीनुसार गट ‘ब’ संवर्गातील (अराजपत्रित) पदे या परीक्षेतून भरली जातात.

राज्य शासनाच्या पोलिस दलाच्या महाराष्‍ट्रातील कोणत्याही कार्यालयात या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. ९,३०० ते ३४,८०० रुपये इतके वेतन या अधिकाऱ्यास असून ४३०० रुपयांचा महागाई भत्ताही दिला जातो. ज्येष्ठता पात्रतेनुसार या अधिकाऱ्याला उच्च पदावर काम करण्याची बढतीची संधी उपलब्ध करून दिली जाते. ही परीक्षा एकूण चार टप्प्यात घेतली जाते. पूर्व परीक्षा – ३०० गुण, मुख्य परीक्षा – ४०० गुण, शारीरिक चाचणी – २०० गुण, मुलाखत – ७५ गुण. यातील पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यासाठी घेतली जाते.

आयोगाने घोषित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारास मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येते. मात्र पूर्वपरीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जात नाहीत. तसेच पूर्वपरीक्षेचे गुणही उमेदवारांना कळविले जात नाहीत. हाच नियम मुख्य परीक्षेसाठीदेखील लागू पडतो. मुख्य परीक्षेकरिता आयोगाने ठरविलेले किमान किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणारे उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतात. शारीरिक चाचणीमध्ये किमान १०० गुण मिळणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतात. जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरतात. त्यांनी मुलाखतीच्या वेळेस सर्व मूळ कागदपत्रे बरोबर ठेवणे गरजेचे असते. ही पोलीस उपनिरीक्षक पदाविषयी माहिती झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) संयुक्त परीक्षा गट-ब- २०२३ मधील ३७४ पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखती अनेक महिन्यांपासून रखडल्या होत्या. मुख्य परीक्षेच्या एका वर्षानंतर उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. शारीरिक चाचणी झाल्यावरही मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर न झाल्याने उमेदवारांची चिंता वाढली होती. अखेर आयोगाने सोमवारी वेळापत्रक जाहीर केले असून ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मुलाखती होणार आहेत. त्यानंतर १५ फेब्रुवारीला निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

‘एमपीएससी’च्या विविध परीक्षांना होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहीला आहे. संयुक्त परीक्षा- २०२३ मध्ये इतर पदांसाठी ३७४ पोलीस उपनिरीक्षक पदांचा समावेश होता. परंतु, इतर सर्व पदांच्या मुलाखतीनंतर उमेदवारांना नियुक्तीही मिळाली आहे. परंतु, पोलीस उपनिरीक्षक पदाच्या प्रत्येक परीक्षेसाठी आयोगाकडून कायम विलंब होत असल्याची उमेदवारांची तक्रार होती. संयुक्त पूर्व परीक्षा ही एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ ला मुख्य परीक्षा घेण्यात आली. यातील पोलीस उपनिरीक्षक पदासाठी होणाऱ्या शारीरिक चाचणीमध्ये प्रचंड विलंब करण्यात आला. डिसेंबर २०२४ मध्ये या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीतील आचारसंहितेचे कारण देत आयोगाकडून वारंवार शारीरिक चाचणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर शारीरिक चाचणी झाल्यावर आयोगाकडून मुलाखती घेण्यास विलंब झाला होता. एका परीक्षेसाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी जात असल्याने उमेदवारांची चिंता वाढली होती. विशेष म्हणजे महिला उमेदवारांना यामुळे अनेक कौटुंबिक अडचणींना सामोरे जावे लागते. अखेर आयोगाने वेळापत्रक जाहीर केले असून आता ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मुलाखती होणार आहेत.