नागपूर : सोनेगाव हद्दीत शेअर्स गुंतवणुकीच्या नावाखाली अनेक सुशीक्षितांची अडीच कोटींहून अधिक फसवणूक करणाऱ्या ठगबाज दाम्पत्याचे प्रकरण ताजे असतानाच सहकारी पतसंस्थेच्या आडून ‘धनलक्ष्मी लाभ योजना’ व घरगुती दिवाळी फंड योजनेच्या नावाखाली अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका कुटुंबाने नागपूकरांना सहा कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.
कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चव्हाट्यावर आलेल्या या प्रकरणात पोलिसांनी ५.९० लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मात्र गंडा घातलेल्या गुंतवणूकदारांची संख्या अधिक असल्याचा दावा तक्रारदारानेच केला आहे. नागसेन साधू मेश्राम (५५, बौद्धनगर, जयभीम चौक, कामठी) आणि त्याची पत्नी प्रणिता (५०), मुलगी अश्विनी मेश्राम उर्फ अश्विनी मंगेश सोमकुवर (३२) अशी नागपूकरांना गंडा घालणाऱ्या ठगबाज कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.
या प्रकरणात सुखदेव महादेव वाघमारे (५६, रमानगर रेल्वे चौक, कामठी) यांनी तक्रार केली. यात नागसेन मेश्राम हा त्रिरत्न नागरी सहकारी पतसंस्था संचालक आहे. त्याच पतसंस्थेत वाघमारे रोजच्या व्यवहारातल्या ठेवी जमा करण्याचे काम करत होते. २२ जानेवारी ला वाघमारे यांनी तब्येत खराब झाल्याने हे काम बंद केले. ते करत असताना मेश्राम कुटुंबाने धनलक्ष्मी लाभ योजना व घरगुती दिवाळी फंड योजना सुरू करत असल्याचे वाघमारे यांना सांगितले. या योजनेत पैसे गुंतविल्यास पतसंस्थेहून अधिक ८ ते १८ टक्के दराने व्याज मिळेल, असा दावा ठगबाज कुटुंबाने केला.
२२ नोव्हेंबर २०२२ ला वाघमारे यांनी पत्नीच्या नावे ५ लाख गुंतविले. त्यांना नोव्हेंबर २०२३ मध्ये ५.४० लाख रुपये मिळणार होते. मात्र ठगबाजांनी त्यांना साडेतीन लाख रुपयेच दिले. वाघमारे यांनी जून २०१८ मध्ये दिपावली फंड योजनेत स्वत:च्या नावाने आणखी दोन लाख गुंतविले. त्यात साडेपाच वर्षांनी म्हणजे २८ डिसेंबर २०२३ मध्ये दुप्पट पैसे मिळणार होते.
मात्र ठगांनी ते पैसे परत केलेच नाही. त्यांनी वाघमारे यांचे व्याजाचे मिळून ५.९० लाख रुपये लुबाडले. इतरही अनेक गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले असून त्यांनादेखील रक्कम मिळालेली नसल्याची तक्रार वाघमारे यांनी केली. त्यांच्या तक्रारीवरून तीनही आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सोनेगाव घटनेची पूनरावृत्ती
दोनच दिवसांपूर्वी सोनेगाव पोलीस हद्दीत ठगबाज दाम्पत्याच्या फसवणूक कारनाम्यांची अशी घटना उघडकीस आली होती. आमच्या गुंतवणूक फर्म मार्फत शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास दुप्पट परतावा मिळेल, असे आमिष दाखवून लबाडीचे रॅकेट चावणारे ठगबाज दाम्पत्य प्रफुल्ल सुधाकर चाटे व त्याची पत्नी अवनी या दोघांनी शहरातील अनेकांची तब्बल २.३७ कोटी रुपयांची फसवणूक करत पोबारा केला आहे.
वर्धा मार्गावरील उच्चभ्रूंची वस्तीतल्या सोनेगावात या ठगबाजांनी दोन डझनांहून अधिक सुशिक्षितांना गंडा घातला आहे. त्यांनी केलेल्या फसवणूकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असताना कामठीत पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली.