बुलढाणा: सध्या बुलढाण्या सह देशभरात इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेची धूम सुरु आहे. त्यातच आता ‘प्ले-ऑफ’ मध्ये स्थान मिळविण्यासाठी सर्वच संघात टोकाची चूरस निर्माण झाली आहे. यामुळे सर्वच सामने अटीतटीचे ठरत असून चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. असाच उत्साह आयपीएलवर जुगार, सट्टा खेळणाऱ्या मध्ये देखील ओसंडून वाहत आहे. त्यांच्यासाठी ही स्पर्धा म्हणजे मोठा जॅकपॉटच ठरत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, चिखली ही शहरे आयपीएल जुगाराची मोठी केंद्र आहेत. नुकतेच बुलढाणा शहरातही आयपील जुगार प्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याने आता या गोरख धंद्याचा विस्तार झाल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर चिखली नगरीत पोलीस दलाने कारवाई करीत आयपीएल सामन्यावर सट्टे बाजी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे याच्या नेतृत्वात नेतृत्वात चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत सट्टेबाजांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. २ सट्टेबाजांना अटक करण्यात आली असून दोघे फरार आहेत. काल शुक्रवारी , २५ एप्रिलच्या रात्री उशिरा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना चांगलाच रंगला. या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
चक्क ‘बुलेट’ने फिरती सेवा
चिखली शहर परिसरात दोघे आरोपी बुलेट या दमदार वाहनाचाचा वापर करुन फिरता फिरता सट्टा लावत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर यांच्या नेतृत्वातील पथक सट्टेबाजांच्या मागावर होते. गांधी नगरात दोन सट्टेबाज त्यांच्या बुलेट वाहनावर फिरत सट्टेबाजी करत असल्याचे पथकाला दिसल्यानंतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
मोहिज खान आत्ता मोहम्मद खान आणि अंकुश कायस्थ (दोघे राहणार चिखली, जिल्हा बुलढाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे आरोपी देशमुख आणि धंदर नामक मोठ्या सटोड्यांच्या संपर्कात होते अशी माहिती प्राथमिक चौकशी निष्पन्न झाले आहे. देशमुख आणि धंदर हे फरार झाले असून पथक त्यांच्या मागावर आहेत.
आरोपींकडून पोलिसांनी १५ हजार रूपये, दोन मोबाईल, मोबाईल मधील काही स्क्रीन शॉट, चिठ्या आणि बुलेट असा अंदाजे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चिखली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.