नागपूर : राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत गेल्या वर्षीच्या अयोध्या यात्रेचे शुल्क इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला (आयआरसीटीसी) अद्याप दिलेले नाही. आयआरसीटीने २०२४-२५ मध्ये २५ यात्रांचे आयोजन केले. परंतु, त्याचे १ कोटी ८६ लाख ४७ हजार ८७५ रुपये मिळाले नाहीत. यामुळे आयआरसीटीसीने त्यांच्या पुढील यात्रा स्थगित ठेवल्या आहेत.
थकीत रकमेबाबत आरआयसीटीसीने २४ एप्रिल २०२५ ला सामाजिक न्याय विभागाला पत्र लिहिले. परंतु, पुढे हालचाल न झाल्याने या वर्षीची (२७ जुलै ते ५ ऑगस्ट) अमरनाथ यात्रा अनिश्चिततेच्या सावटात सापडली आहे.
योजनेचे स्वरूप…
राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी गेल्या वर्षी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू केली. देशातील ७३ आणि महाराष्ट्रातील ६६ तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे. रेल्वे व बस प्रवासाचे नियोजन करण्यासाठी पर्यटन कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आयआरसीटीसी समकक्ष नोंदणीकृत कंपन्यांची निवड केली जाते.
आयुक्तांकडून प्रधान सचिवांना पत्र
२०२४-२५ मधील थकीत रक्कम मिळावी तसेच २०२५-२६ या वर्षासाठीच्या प्रस्तावावर कार्यवाही करण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, असे पत्र समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांनी २१ जुलै २०२५ रोजी सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना लिहिले.
राज्य सरकारकडून निधी मिळेल, सरकारी रक्कम कुठे जात नाही. अमरनाथ यात्रेबाबत काहीही माहिती नाही. – ए. के. सिंह, डीजीएम (जनसंपर्क अधिकारी), आयआरसीटीसी.