गोंदिया : भारतीय स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतून, कवी नामदेव ढसाळांनी विविध कवितेतून समतेची मांडणी केली. परंतु भारतीय राज्यघटनेला अपेक्षित असं घडलं नाही. परिणामी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळापर्यंत अजूनही साहित्यिकांना समतेच्या कविता लिहाव्या लागतात हे देशाचं फार मोठे दुर्दैव आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी बोलून दाखविली.

डॉ. जोशी हे गोंदियातील संथागार हॉल इथं रविवार (१४ मे) आयोजित पुस्तकं प्रकाशन समारंभात बोलत होते. कवी नंदू वानखडे यांनी लिहिलेली २ पुस्तके ज्यामध्ये कविता संग्रह ‘अंतर्मनातली आंदोलने’ आणि कथासंग्रह ‘ज्याला नाही माय’ या पुस्तकांचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा. युराज गंगाराम होते. मंचावर डॉ. सुरेश खोब्रागडे, प्रा. प्रमोद अनेराव आणि कवी नंदू वानखडे उपस्थित होते.

हेही वाचा – भंडारा : उधारीच्या पैशाचे कारण, तरुणाचे केले अपहरण

डॉ. जोशी म्हणाले की, विद्रोहाचे पाणी पेटले आहे. राज्यघटना सांभाळून ठेवणे मूठभर लोकांची जबाबदारी नाही, शोषणाचे स्वभाव आणि चरित्र यात बदल झालेला नाही, असे सांगून नंदुची कविता विचारांची चेतना निर्माण करते, असे ते म्हणाले.

यावेळी युराज गंगाराम यांनी सांगितलं की, कवी नंदू आपल्या कवितेत जीवनाची चर्चा करतो असे सांगून त्यांच्या कवितेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचे टोकदार शस्त्र आहे असे ते म्हणाले. एकाबाजूला एकाधिकारशाही आणि फॅसीझम डोके वर काढत असताना धर्मनिरपेक्ष कवी हात बांधून कसा काय शांत राहू शकतो, असा उलट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. डॉ. खोब्रागडे म्हणाले की, कवी सामान्य माणूस नाही. कवीला अन्यायग्रस्तांचे नेतृत्व करावं लागतं. कवी हा योद्धा असून त्याला विविध पातळ्यांवर युद्ध करावा लागतो. कवीला नव्या पिढीचेही भविष्य लिहिण्याची गरज आहे.

हेही वाचा – अमरावती: विहिरीच्या पाण्याची‎ दुर्गंधी येत होती, पाण्याचा उपसा केला असता आढळून आला शीर, हात कापलेला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रा. अनेराव यांनी कवी आणि कथा यामधील फरकाचे स्पष्टीकरण सांगितलं. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यां अ‍ॅड. सविता बेदरकर, मिलिंद रंगारी यांनी कविता संग्रहातील कविता वाचून दाखविल्या. दरम्यान कवी माणिक गेडाम, कालिदास सूर्यवंशी आदि साहित्यिकांना कथासंग्रह आणि कविता संग्रह भेट देण्यात आले. दरम्यान जूही वानखडे यांनी रमाई हा एकपात्री प्रयोग या प्रसंगी सादर केला. अत्यंत उत्कृष्ट अशा या कार्यक्रमाची उपस्थितांनी तोंड भरून स्तुती केली. यावेळी चित्र प्रदर्शनाचंही पाहुण्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी नंदू वानखडे यांनी केलं. संचालन जूही नंदू वानखडे यांनी तर आभार गौतम गजभिये यांनी मानले. यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.