गोंदिया: भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व रेल्वे विभागाद्वारे चक्रधरपूर मंडळात आगामी काळात विविध ठिकाणी रेल्वे ट्रॅकचे नवीनीकरण करण्यात येणार असल्याने इतवारी रेल्वे स्थानकावरून सुटणारी टाटानगर-इतवारी-टाटानगर ३० दिवस रद्द करण्यात आली आहे.

 रेल्वे लाईन व नवीनीकरणाची कामे सुरळीत सुरू राहावित म्हणून विविध विभागांत  ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या महिन्यांच्या निर्धारित तारखांना काही गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली. यात डाऊन लाईन कांसबहाल राउरकेला दर शनिवारी म्हणजेच ११, १८, २५ ऑक्टोबर, १, ८, १५, २२, २९ नोव्हेंबर आणि ६, १३ डिसेंबर रोजी तर अप लाईन राउरकेला-कांसबहाल दरम्यान दर मंगळवारी म्हणजेच १४, २१, २८ ऑक्टोबर तसेच ४, ११, १८, २५ नोव्हेंबर आणि २, ९, १६ डिसेंबर रोजी आणि संयुक्त लाईन बडा मुंडा ए केबिन-राउरकेला दरम्यान दर शनिवारी म्हणजेच २०, २७ डिसेंबर आणि ३. १०, १७ जानेवारी आणि अप लाईन बडा मुंडा-ए- केबिन राउरकेला दरम्यान दर मंगळवारी २३, ३० डिसेंबर रोजी आणि ६. १३, २० जानेवारी रोजी ट्रॅक नूतनीकरणाचे काम केले जाईल. यामुळे ट्रेन क्रमांक

१८१०९/१८११० टाटानगर-नेताजी

सुभाषचंद्र बोस इतवारी-टाटानगर एक्सप्रेस ११, १४, १८, २१, २५, २८ ऑक्टोबर तसेच १, ४, ८, ११, १५, १८, २२, २५, २९, नोव्हेंबर रोजी रद्द राहील. २, ६, ९, १३, १६ डिसेबर तसेच २०, २३, २७, ३० डिसेंबर आणि ३, ६, १०, १३, १७, २० जानेवारी या तारखांना टाटानगर-इतवारी-टाटानगर गाडी रद्द राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

पर्यटन रेल्वगाडी सोमवारपासून.. गोंदियातून ही जाणार..

दक्षिण रेल्वेच्या वतीने १३ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत भारत गौरव पर्यटक विशेष तिरुनेलवेली-अयोध्या-तिरुनेलवेली ही गाडी चालविण्यात येणार आहे. दक्षिण भारत गौरव पर्यटक विशेष ही विशेष पर्यटन ट्रेन दक्षिण भारतातील विविध शहरांमधून यात्रेकरूंना अयोध्या धामसह उत्तर भारतातील प्रमुख धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी घेऊन जाणार आहे. या भारत गौरव विशेष गाडीमध्ये एकूण १४ एलएचबी कोच असतील.

मेमू ट्रेन सुरू करण्याची मागणी

गोंदिया आणि रायपूर दरम्यान ०८७२४-०८७२३ क्रमांकाची मेमू लोकल ट्रेन पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. ही ट्रेन सकाळी ७ वाजता गोंदियाहून सुटत असे, ११.२० वाजता रायपूरला पोहोचत असे, संध्याकाळी ७वाजता रायपूरहून सुटत असे आणि रात्री ११.१५ वाजता गोदियाला पोहचायची. गेल्या काही वर्षांपासून ही ट्रेन बंद आहे. विशेषतः दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, व्यवसायिक, कामगार यांच्यासाठी ही गाडी सोयीची आहे. ही ट्रेन बंद असल्याने सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होत आहे. आधुनिक गाड्या सुरू असल्या आणि काही प्रवाशांना त्यांचा फायदा होत असला तरी, लोकल ट्रेनने प्रवास करणे सामान्यांसाठी अधिक सोयीस्कर आहे. करीता गोंदिया-रायपूर लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी होत आहे.