जळगाव : वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी जळगाव भोवती पाळधी ते पाळधी असा सुमारे ४० किलोमीटरचा रिंग रोड प्रस्तावित आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष पाठपुरावा केलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे जळगावच्या विकासाला आणखी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, शासनाकडून रिंग रोडचा इतक्या वर्षात गांभीर्याने विचार करण्यात आलेला नाही.
पाळधी ते नशिराबाद दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना आतापर्यंत जळगाव शहरातून जाणाऱ्या जुन्हा राष्ट्रीय महामार्गाचा वापर करावा लागत होता. त्याचप्रमाणे विमानतळाकडून पाळधीकडे, शिरसोलीहून ममुराबादकडे किंवा आसोद्याहून शिरसोलीकडे जाणाऱ्यांना शहरातील वाहतुकीतूनच मार्गक्रमण करावे लागते. या परिस्थितीमुळे शहरातील वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाहतूक कोंडीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. नागरिकांचा वेळ आणि इंधनाचा अनावश्यक खर्च मोठ्या प्रमाणात होत आहे. ही समस्या लक्षात घेऊन नागरिकांना दिलासा मिळावा आणि ग्रामीण भागाला एकमेकांशी थेट जोडणारा पर्यायी मार्ग निर्माण व्हावा, या उद्देशाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून जळगाव शहराला वळसा घालणाऱ्या रिंग रोडचा प्रस्ताव शासनाकडे काही वर्षांपूर्वी सादर करण्यात आला होता.
धरणगाव, जळगाव आणि एरंडोल तालुक्यातील ११ गावे जोडणाऱ्या नियोजित रिंग रोडची एकूण लांबी सुमारे ४० किलोमीटर असणार आहे. त्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण करून पाळधी, दोनगाव, फुपनगरी, ममुराबाद, आसोदा, तरसोद, नशिराबाद, मन्यारखेडा, कुसुंबा, मोहाडी, टाकरखेडा आणि पुन्हा पाळधी गावांना जोडणाऱ्या रिंग रोडचा विकास आराखडा शासनाकडे यापूर्वीच सादर केला आहे. नियोजित रिंग रोडवरील गावांना जोडणाऱ्या आणि सध्या अस्तित्वात असलेल्या ग्रामीण मार्गाला राज्य मार्गाचा दर्जाही देण्यात आला आहे. राज्यमार्ग ३८ वरील पाळधी आणि दोनगाव ही गावे धरणगाव तालुक्यात, तसेच फुपनगरी, ममुराबाद, आसोदा, तरसोद, नशिराबाद, मन्यारखेडा, कुसुंबा आणि मोहाडी ही गावे जळगाव तालुक्यात तर टाकरेडा हे एकमेव गाव एरंडोल तालुक्यातील आहे. रिंग रोडलगतची १० गावे ही पालकमंत्री पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात समाविष्ठ आहेत.
मुंबई महामार्ग अधिनियम १९५५ नुसार जळगाव भोवती प्रस्तावित राज्यमार्ग दर्जाच्या रिंग रोडची रूंदी ३० मीटर (१०० फूट) इतकी निश्चित करण्यात आली आहे. पैकी बहुतांश रस्त्याचा ताबा सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. काही रस्त्याचे भूसंपादन करावे लागणार आहे. आणि ज्यासाठी सुमारे एक हजार कोटी रूपयांच्या निधीची गरज भासणार आहे. याशिवाय, गिरणा नदीवर दोनगाव ते फुपनगरी दरम्यान आणि सावखेडा ते टाकरखेडा दरम्यान मोठे पूल उभारावे लागणार आहेत. प्रत्यक्षात भूसंपादनासाठी आवश्यक निधीसह इतरही काही अडथळ्यांमुळे रिंग रोडची अंमलबजावणी अद्याप होऊ शकलेली नाही. पालकमंत्री पाटील यांच्या स्वप्नातील रिंग रोड इतक्या वर्षात कागदावरच राहिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी जळगाव दौऱ्यावर आले असता, पालकमंत्री पाटील यांनी रिंग रोडसाठी त्यांच्याकडे आवश्यक निधीची मागणीही केली होती. मात्र, त्यांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.
