नागपूर : पूर्व नागपुरातील सतरंजीपुरा येथे काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते सोमवारी समोरासमोर आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांना जाब विचारण्यासाठी त्यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही बाजूला कठडे लावून कार्यकर्त्यांना रोखले.
काँग्रेसचे विधान परिषद सदस्य ॲड. अभिजीत वंजारी यांच्या वर्धमाननगर येथील जनसंपर्क कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी रविवारी शाईफेक केली होती. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाला प्रतिउत्तर देण्यासाठी पुन्हा भाजप कार्यकर्ते रस्त्यावर आले. तर दुसरीकडे शाईफेकीमुळे संतप्त काँग्रेस कार्यकर्ते पूर्व नागपूरचे भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या कार्यालयाकडे धाव घेत होते. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही बाजूला संरक्षित कठडे लावले.
ॲड. वंजारी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या फलकावर आमदार ,पूर्व नागपूर असे लिहिले आहे. पण, भाजपचे आमदार खोपडे आपल्या कार्यकर्त्यांना उचकाऊन फलकावरून राजकारण करत आहेत. कार्यकर्त्यांची माथी भडकवत आहेत. ॲड. वंजारी यांच्या कार्यालयाच्या फलकाला काळे फासण्यात आले, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
भाजपचे म्हणणे काय?
लकडगंज पोलिसांना १५ दिवसांपूर्वी निवेदन दिले आणि ॲड. वंजारी यांच्या फलकाकडे लक्ष वेधण्यात आले होते. ते विधान परिषदेचे आहेत. ते पूर्व नागपूरचे आमदार नाहीत. ते २०१४ मध्ये येथून लढले आणि ४५ हजार मतांनी हरले. पूर्व नागपूरचे आमदार असे फलकावर लिहून ते लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यांनी फलकावर विधानसभा क्षेत्र नागपूर जिल्हा लिहायला हवे. तसेच विधान परिषद असा उल्लख असायला हवा, असे भाजपचे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष काय म्हणतात?
काँग्रेसच्या आंदोलनात सहभाग झालेले आमदार व शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी कसे वागू नये हे म्हणजे शाहीफेक प्रकरण आहे, वंजारी यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला. शाईफेक करण्यात आली. ज्यांनी ते केले त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आम्ही रस्त्यावर उतरलो तर शहराचे वातावरण खराब होईल आणि याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसेल. आपल्या कृतीमुळे सर्वसामान्य जनतेचा नुकसान होणार नाही. याचे भान राजकीय नेत्यांनी ठेवले पाहिजे. सणासुदीच्या दिवस आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी शहरात शांती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. भाजपच्या या कृतीमुळे शहराला कलंक लागला आहे. शुल्लक कारणांसाठी या पद्धतीची तेढ निर्माण करतील, तर आम्हाला रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल. ते ज्या पद्धतीने आमच्याशी वागतील त्याच पद्धतीने आमची वागण्याची तयारी आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, पालकमंत्री, पोलीस आयुक्तांशी भेटणार आहोत आणि सांगणार आहोत. या पद्धतीचे वातारण निर्माण होत असेलतर जबाबदारी सरकारची असेल. काँग्रेस जशाच तसेच प्रतिउत्तर देण्यास सक्षम आहे, असेही ते विकास ठाकरे म्हणाले.