लोकसत्ता टीम

नागपूर : शहरातील जुगार अड्डे, दारू विक्री, वरली-मटका आदी अवैध धंदे बंद करण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. जुगार खेळणाऱ्यांवर छापे घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम पोलिसांचे आहे. मात्र, कळमना पोलीस कर्मचारी चक्क चौकीतच जुगार खेळतानाची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागपूर पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलबंनाची कारवाई केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून नागपूर पोलीस चांगलेच चर्चेत आले आहेत. कळमना पोलीस ठाण्यातील वादग्रस्त पोलीस कर्मचारी मनोज घाडगे आणि शाहू साखरे यांच्यासह काही कर्मचारी कळमना गाव पोलीस चौकीत जुगार खेळत होते. तसेच एका पोलीस कर्मचारी सिगारेट पित होता. यादरम्यान चौकीत तक्रार करण्यासाठी एक तक्रारदार आला. त्यावेळी पोलीस कर्मचारी जुगार खेळण्यात व्यस्त होते. त्या तक्रारदाराचे कुणीही ऐकून घेत नव्हते. त्यामुळे हतबल झालेल्या तक्रारदाराने शेवटी भ्रमनध्वणीने जुगार खेळणाऱ्या पोलिसांची चित्रफित बनवली. ती समाजमाध्यमांवर प्रसारित केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या चित्रफितीची गांभीर्याने दखल घेतली आहे. काही पोलीस स्टेशनमध्ये असेच दृष्य नेहमी असल्यामुळे जुगार खेळणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस आयुक्त काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.

आणखी वाचा-चंद्रपूर : समाज माध्यमावरील मैत्री तरूणीला भोवली, प्रकरण पोलिसांत

यापूर्वीही घडल्या घटना

पोलीस ठाण्यात किंवा गुन्हे शाखेच्या युनिटमध्ये पोलीस कर्मचारी जुगार खेळत असल्याचे यापूर्वीही उघडकीस आले आहे. काही वेळा चित्रफितीही समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यरत गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील काही कर्मचारी जुगार खेळत होते. एका पोलीस कर्मचाऱ्यानेच त्यांचे भ्रमनध्वणीने छायाचित्रण केले आणि प्रसारमाध्यमांना पाठवले होते. तसेच गिट्टीखदान आणि वाडी पोलीस ठाण्यातील डीबीचे कर्मचारीसुद्धा जुगार खेळताना आढळले होते. तसेच परिमंडळ पाचच्या एसीपी कार्यालयातही पोलीस कर्मचारी दारु आणि जुगार खेळताना आढळले होते.

दोन्ही पोलीस कर्मचारी निलंबित

वादग्रस्त पोलीस कर्मचारी मनोज घाडगे हा पूर्वी कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेती वाहतूक करणाऱ्यांकडून वसुली करण्यासाठी ओळखला जायचा. मनोजसह त्याचे दोन अन्य साथिदारही वसुलीत मग्न होते. ‘दोन्ही पोलीस कर्मचारी जुगार खेळताना एका चित्रफितीत दिसत आहेत. ती चित्रफित बहुदा जुनी असावी. कारण सध्या दोन्ही कर्मचारी बीट मार्शल म्हणून कार्यरत नाहीत. दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.’ अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली.

आणखी वाचा-गडचिरोली : मोबाईल चार्जरसाठी युवतीला बेदम मारहाण; संतापाची लाट…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांचा ‘डान्स व्हायरल’

स्वातंत्र्यदिनाला तहसील पोलीस ठाण्यात काही महिला पोलीस आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी ‘खयके पान बनारस वाला’ या गाण्यावर ठेका धरला. एका पोलीस कर्मचाऱ्याने गीत गायले. गाण्यावर पोलीस ठाण्यातील इतरही पोलीस कर्मचारी थिरकताना दिसत आहेत. या नृत्याची चित्रफित समाजमाध्यमांवर चित्रफित प्रसारित झाली. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतरचे नृत्य चांगलेच चर्चेत आले.