वर्धा : भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या हे सोमवारी वर्धा दौऱ्यावर आले होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर आरोपांची राळ उडवून देण्यात ते प्रसिद्ध झाले. मध्यंतरी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने पण ते चांगलेच चर्चेत आले होते. मात्र आजच्या वर्धा दौऱ्यात त्यांची बैठक चर्चेत आली आहे. त्यावरून समाज माध्यमावर टीका सूरू झाली आहे.
वर्धा येथे येताच त्यांचे भाजप नेत्यांनी स्वागत केल्यावर ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. उपजिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी रोहिग्यांना दिलेल्या दाखल्याचा प्रश्न उपस्थित केला. मात्र यावेळी सोमय्या हे थेट उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत जाऊन बसले, असे छायाचित्र प्रसिद्ध झाले आणि गदारोळ सूरू झाला. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी तर यावर पोस्ट टाकून “अभ्यासू लोकांच्या खुर्चीवर, असे ऐरे गैरे लोकं बसूच कसे शकतात”, असा प्रश्न विचारला. भाजपशासित राज्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच पार पोतेरे करून ठेवलंय, अशी टिपणी अंधारे यांनी या पोस्टमधून केली. याच स्वरूपाची टीका काही काँग्रेस समर्थकांनी फेसबुकवर केली आहे.
मात्र ही टीका चुकीची असल्याचा दावा सोमय्या यांच्या दौऱ्यात सहभागी भाजप नेते श्रीधर देशमुख यांनी केला. फोटो तपासून बघा. सोमय्या हे उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात गेले होते. तेव्हा उपजिल्हाधिकारी हे दालनात नव्हते. म्हणून त्यांच्या स्टाफ सोबत बसून सोमय्या यांनी चर्चा केली. फोटोत तसे स्पष्ट दिसते. नाहक वाद उपस्थित केल्या जात आहे, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. या भेटीनंतर सोमय्या हे जिल्हाधिकारी मॅडम यांना पण भेटले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते हे पण उपस्थित होते.
जिल्हाधिकारी वॉन्मथी सी. यांच्याशी बोलतांना किरीट सोमय्या यांनी वर्धा जिल्ह्यात ८०० अनधिकृत रोहिंगे वास्तव्यस असल्याचा आरोप केला. या अश्या अनधिकृत वास्तव्य करीत असलेल्या लोकांना जन्म प्रमाणपत्र, रेशन कार्ड, मतदार पत्र मतदार यादीत नोंदणी मिळाली आहे. ते सर्व रद्द करावे. प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे हे दाखले देण्यात आले. ही चिंतेची बाब आहे. त्वरित कारवाई झाली पाहिजे. देशाच्या सुरक्षेशी चाललेला खेळ थांबवावा अशी भूमिका सोमय्या यांनी मांडली. या चर्चेत माजी खासदार सुरेश वाघमारे तसेच जयंत कावळे, अर्चना वानखेडे, श्रीधर देशमुख, प्रशांत बुर्ले, श्रेया देशमुख, वंदना भुते, चित्रा ठाकूर, पल्लवी मोहळकर व अन्य उपस्थित होते.