गडचिरोली : जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असताना वाढदिवशी तलवारीने केक कापून ‘भाईगिरी’ करणाऱ्या कुरखेडा येथील युवकांना पोलिसांनी दणका देत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. ६ डिसेंबर रोजी संबंधित घटनेची चित्रफित समाज माध्यमावर सार्वत्रिक झाल्यानंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कारवाईचे निर्देश दिले होते.

तौसिफ रफीक शेख (३६),अशफाक गौहर शेख(३४), परवेज फिरोज पठाण (२५), शाहरूख नसिम पठाण(२५) व इतर सर्व राहणार कुरखेडा अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तलवार व दीड हजार रुपये रोख देखील जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा…तेलंगणा बँक दरोड्याचे ‘बुलढाणा कनेक्शन’ ! दोन आरोपी मोताळा तालुक्यातील

गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात अवैध दारू व रेती तस्करीला उत आला आहे. यामुळे गुंडगिरीदेखील वाढल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले होते. दरम्यान, ३० नोव्हेंबररोजी आरोपीमधील एकाचा वाढदिवस होता. यावेळी काही युवकांनी एकत्र येत हुल्लडबाजी करीत तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी या प्रसंगाची चित्रफित बनवून समाज माध्यमावर देखील टाकली. विशेष म्हणजे घटनेच्यावेळी जिल्ह्यात जमावबंदी लागू होती. दरम्यान ६ डिसेंबररोजी संबंधित घटनेची चित्रफित सर्वत्र ‘व्हायरल’ झाली. सदर बाब गंभीर असल्याने पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांनी तात्काळ कारवाईचे निर्देश देताच कुरखेडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपींना ताब्यात घेत विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले. यावेळी पोलिसांसमोर आरोपींनी गुन्हा कबूल करून अशाप्रकारचे कृत्य यापुढे करणार नाही, म्हणून माफी मागितली. या संदर्भातील चित्रफित पोलीस विभागाने जारी केली आहे. या कारवाईमुळे ‘भाईगिरी’ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कुरखेड्यातील नागरिकांनी स्वागत केले असून यामुळे परिसरातील गुंडगिरीला आळा बसेल अशी अशा व्यक्त केली आहे.

हेही वाचा…विद्यार्थ्यांनो अंतिम मुदतवाढ, अन्यथा,,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीसी खाक्या दाखवताच मागितली माफी

६ डिसेंबर रोजी या घटनेची चित्रफीत सर्वत्र ‘व्हायरल’ होताच पोलीस विभागाने चौकशी करून तत्काळ चार आरोपींना ताब्यात घेतले. सोबतच चित्रफितीत दिसणाऱ्या इतर टवाळखोरांवर देखील गुन्हे दाखल केले. तलवारीने केक कापून परिसरात दहशत पसरवण्याचा त्यांचा हेतू होता. मात्र, पोलिसांनी दणका देताच सर्व आरोपीनी कानाला हात लावून माफी मागितली व पुन्हा असा प्रकार करणार नाही. असे लिहून दिले. माफी मागतानाची चित्राफित पोलिसांनी प्रसारित केली आहे. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अशाचप्रकारे कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस विभागाने यामाध्यमातून दिला आहे.