यवतमाळ : वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कोलारपिंपरी खुल्या कोळसा खाणीच्या ‘कोलस्टॉक’मधील कोळसा मागील १० दिवसांपासून आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला आहे. या आगीमुळे वेकोलिचे नुकसान होत असतानाही आगीकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथे काम करणाया कामगारांना या आगीची दहकाता सोसावी लागत असून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. वेकोलि प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कामगारांमधून होत आहे. वेकोलिच्या वणी नॉर्थ  क्षेत्रात सद्यस्थीतीत आठ लाख ८५ हजार टन कोळशाचा साठा आहे. यात कोलारपिंपरी मध्ये चार लाख ७५ हजार, उकणीत दोन लाख ४४ हजार, घोंसा येथे एक  लाख ४१ हजार, भांदेवाड्यात चार हजार २०० व जुनाड खाणीत २५० टन कोळशाचा साठा आहे.

हेही वाचा >>> नागपुरात ११२ स्कूलबस, ऑटोरिक्षांवर कारवाई; विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक..

 कोलारपिंपरीत एवढा मोठा कोळशाचा साठा नियमानुसार न ठेवल्याने व त्याची विल्हेवाट त्वरीत न लावल्याने हा कोळसा आगीत धुमसत असल्याचे सांगण्यात येते. वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत  उकणी, कोलारपिंपरी, जुनाड, पिंपळगांव, भांदेवाडा, घोन्सा या ठिकाणी कोळसा खाणी आहेत. या खाणीतून मोठ्या प्रमाणात कोळसा उत्पादन घेतले जाते व खाणीतून काढलेला कोळसा हा कोलस्टॉकवर साठविला जातो. साठविलेल्या या कोळशाला उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आगी लागतात. त्यावर उपाय म्हणून पाणी शिंपडले जाते.

हेही वाचा >>> खबरदार! ट्रॅव्हल्सच्या प्रवाश्यांचे संपूर्ण नाव, पत्ता नसल्यास होणार कठोर कारवाई

 त्यामुळे आगीवर नियंत्रण करता येते. कोलारपिंपरी खुल्या कोळसा खाणीच्या कोलस्टॉवर मागील १० दिवसांपासून आग धगधगत असताना वेकोलिकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. क्षमतेपेक्षा अधिक कोळशाचे उत्पादन अधिक झाल्याने ही परिस्थीती उद्भवल्याचे सांगितले जाते. साठा अधिक असल्याने त्यात वायू तयार होतो, त्यामुळे अशी आग लागत असल्याचे कोलारपिंपरी खाणीचे उपक्षेत्रीय प्रबंधक एच. बी. दास यांनी म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakhs of rupees coal in vekoli coalstock fire damage nrp 78 ysh
First published on: 11-07-2023 at 11:14 IST