अकोला: काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांवर आणखी एक संकट कोसळले होते. सिक्कीम येथे पर्यटनासाठी गेलेले राज्यातील सुमारे १०० नागरिक भूस्खलनामुळे अडकले होते.

त्यामध्ये अकोला शहरातील चार डॉक्टर त्यांच्या कुटुंबासह १६ जणांचा समावेश होता. प्रशासनाच्या मदतीने अकोल्यातील ते पर्यटक सुखरुप परतले आहेत. सिक्कीममध्ये भूस्खलनाचा थरारक अनुभव आल्याचे पर्यटकांनी सांगितले.

राज्यातील पर्यटकांसाठी गेले काही दिवस विविध संकटाचे ठरत आहेत. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य करीत मोठा हल्ला केला. ‘छोटे स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाममधील बैसरन भागात मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांना ठार केले.

यावेळी अकोल्यातील सुमारे ३१ पर्यटक काश्मीरमध्ये अडकून पडले होते. पहलगामला पोहोचण्यापूर्वीच हल्लाची त्यांना माहिती मिळाली. त्यामुळे त्यांना जाण्यापासून रोखण्यात आले. राज्य शासनाच्या मदतीने विशेष विमानाने ते अडकलेले पर्यटक मुंबईला आले. त्यानंतर बसने हे पर्यटक अकोल्यात सुखरुप आले आहेत. या संकटातून पर्यटक सावरत नाही तर तेच राज्यातील सुमारे १०० हून अधिक पर्यटक सिक्कीममध्ये भूस्खलनामुळे अडकले होते.

सिक्कीम राज्यात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात पाऊस पडला. या पावसामुळे सिक्कीम राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. त्यामुळे रस्ते बंद पडले होते. या ठिकाणी हजारो पर्यटक अडकले. अडकलेल्या पर्यटकांसाठी युद्धस्तरावर मदत कार्य करून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. राज्यातील १०० हून अधिक पर्यटक भूस्खलनात अडकून होते.

त्यामध्ये अकोल्यातील १६ पर्यटकांचा समावेश होता. सिक्कीममधील लाचूंग येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. लाचूंग हे ठिकाण सिक्कीममधील मंगन जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. अकोल्यातील डॉ. शितल टोंगसे, डॉ. प्रशांत बारापात्रे, डॉ. संजय शिंदे आणि डॉ. प्रभाकर जायभाये हे चार डॉक्टर कुटुंबीयांसह पर्यटनासाठी गेले होते.

ते अडकून पडल्याचे माहिती पडताच महाराष्ट्र सरकारकडून देखील सिक्कीम राज्यातील सरकार आणि प्रशासनाशी संपर्क करून पर्यटकांना मदतीसाठी प्रयत्न करण्यात आले. भूस्खलनाच्या संकटातून पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.

त्यानंतर पर्यटक सुखरुप या संकटातून बाहेर पडले. अकोल्यातील सर्व १६ पर्यटक शहरात परत आले आहेत. सिक्कीम राज्यात पर्यटन करतांना नैसर्गिक आपत्तीचे पर्यटकांवर संकट आले होते. त्यातून सावरत पर्यटक सुखरुप अकोल्यात दाखल झाले आहेत.